लाडकी बहिण योजनेत येणाऱ्या कागदपत्रांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष कक्ष सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

0
172

लाडकी बहिण योजनेत येणाऱ्या कागदपत्रांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष कक्ष सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

अधिवेशनात बोलताना केली मागणी

राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. यामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. मात्र, या योजनेतील काही अटी रद्द करण्यात याव्यात तसेच महिलांना कागदपत्र तयार करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.
मुंबई येथील अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, नद्यांना पूर आल्याने होणाऱ्या नुकसानीसाठी सरकारने केलेल्या योजनांचे आहे. सोबतच चंद्रपूरात इरई नदीला दरवर्षी पूर येतो, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता इरई नदीवर संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलताना आ. जोरगेवार यांनी केली आहे.
पर्यटनामुळे सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत असतो. चंद्रपूरातही पर्यटनदृष्ट्या विकास केला गेला पाहिजे. चंद्रपूरात जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य आहे. प्राचीन महाकाली मंदिर चंद्रपूरात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पवित्र झालेली दिक्षाभूमी येथे आहे. येथे औद्योगिक आणि मायनिंग पर्यटन होऊ शकते, त्यामुळे येथे टुरिझम सर्किट तयार करण्यात यावे, अशी मागणी यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
चंद्रपूरात इरई नदी हे एकमात्र पाण्याचे स्रोत आहे. येथील पाणी उद्योगासाठी, पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे दुसरा पाण्याचा स्रोत तयार करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता धनोरा बॅरेज सरकारने तयार करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. शासकीय महाविद्यालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, ते लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विज उत्पादक जिल्हांना 200 युनिट विज मोफत द्या

मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील विज उत्पादक जिल्हांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावर बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूरात 5 हजार मेगावॅट पेक्षा अधिक विज आम्ही तयार करतो. असे असतानाही मुंबई आणि चंद्रपूर येथील नागरिकांना विज दर सारखेच आहेत. मुंबईच्या नागरिकांचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. चंद्रपूरहून येथे विज पाठवित असताना लाईन लॉस होतो. असे असतानाही मुंबई आणि चंद्रपूरच्या नागरिकांना विज दर समान कसे, असा प्रश्न यावेळी त्यांनी सभागृहात बोलताना उपस्थित केला. दोन ते अडीच रुपयांत तयार होत असलेली विज आम्हाला 9 ते 20 रुपये प्रति युनिट प्रमाणे विकली जाते. त्यामुळे विज उत्पादक जिल्हांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here