आजचा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे पाऊल – आ. किशोर जोरगेवार

0
97

आजचा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे पाऊल – आ. किशोर जोरगेवार

 

आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, दुर्बल घटक, शेतकरी, विद्यार्थी, कृषी क्षेत्रातील सुधारणा, शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार आणि पर्यावरण संरक्षण या विषयांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प राज्याला सर्वांगीण विकासाची दिशा देणारा आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीकडील महत्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आ. जोरगेवार म्हणाले की, राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना राबविणार आहे. या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानाची रक्कमही 10 हजाराहून 25 हजार करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण तरतूद केली गेली आहे. युवा वर्गासाठीही विविध योजना सरकारने सुरू केल्या आहेत. दुर्बल घटकांनाही न्याय देण्याचे काम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातही मोठ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाने सर्व समाजघटकांना दिलासा दिला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारा हा अर्थसंकल्प निश्चितच प्रशंसनीय आहे. यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here