अमृत पाणीपुरवठा योजना अंतर्गत चुकीच्या पद्धतीने नागरिकांना देण्यात आलेले देयक तात्काळ रद्द करा

0
98

अमृत पाणीपुरवठा योजना अंतर्गत चुकीच्या पद्धतीने नागरिकांना देण्यात आलेले देयक तात्काळ रद्द करा

यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली अमृत पाणी पुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वीच नागरिकांना भरमसाठ देयक देण्यात येत आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने नागरिकांना देण्यात आलेले देयके तात्काळ रद्द करा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

आज शुक्रवारी, यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांना दिले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलीम शेख, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, शहर संघटक विश्वजीत शहा, शहर संघटक करणसिंह बैस, हरमन जोसफ, मुन्ना जोगी, रुपेश पांडे, राम जंगम, दुर्गा वैरागडे, विलास सोमलवार, चंदा ईटनकर, विमल काटकर, अतिना झाडे, कविता निखाडे, नंदा पंधरे, कल्पना शिंदे, सायली तोंडरे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात अमृत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक ग्राहकांच्या घरी डिजिटल मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. अनेक भागात नळ जोडणीचे काम अपुरे आहे. अनेक भागात योजने अंतर्गत नळ जोडणी झाली असली तरी नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.

विशेषतः काही भागात नळाची पाईपलाईन खंडित झालेली आहे. तरीही नागरिकांना ३ महिन्यांचे भरमसाठ देयक देण्यात आले आहे. या चुकीच्या देयकांमुळे नागरिकांना अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यांना प्रत्यक्षात पाणी मिळाले नाही तरीही त्यांना मोठ्या रकमांचे देयक आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. नागरिकांना त्वरित दिलासा देण्यासाठी, महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि चुकीच्या देयकांची चौकशी करून ती रद्द करावीत, अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here