ताई, आता तुम्ही तरी करा आमच्या तालुक्याचा विकास – सुबोध चिकटे

0
320

ताई, आता तुम्ही तरी करा आमच्या तालुक्याचा विकास – सुबोध चिकटे

वर्षानुवर्ष जिवती तालुका विकासापासुन दुर…

जिवती :- शासनाने 2002 मध्ये जिवती तालुक्याची निर्मिती केली. आज घडीला तालुक्यात 84 गावे असून ही गावे विविध समस्येने ग्रासलेली आहेत. त्यामुळे हा तालुका नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. जवळजवळ 23 वर्षे लोटल्यानंतरही जीवती तालुक्याचा आणि तालुक्यातील गावांचा विकास मात्र झाला नाही. येथील अनेक गावे अतीदुर्गम व अविकसित आहेत. चंद्रपूर लोकसभेचे अनेक प्रतिनिधी झाले परंतु कोणीही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही. तालुक्यातील गावात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. विजेचे खांब आहेत पण प्रकाश नाही. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्यामुळे काही गावात तर महामंडळाची बस सुद्धा जात नाही. पावसाळ्यात तर रस्त्यांची एवढी बिकट अवस्था झाली आहे की रस्ता कुठे आणि खड्डा कुठे कळत नसल्यामुळे अनेकांचा नाहक जीव सुद्धा गेला आहे. गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी पायी किंवा अवैध वाहनाने प्रवास करावा लागतो तोही ज्यादा पैसे देऊन हि मोठी शोकांतिका आहे.

जीवती हा अतिदुर्गम भाग असलेला तालुका. त्यात समस्यांचा डोंगर मोठा आहे. एकीकडे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याकडून डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया असे नारे लावल्या जात आहेत पण स्वातंत्र्य काळाच्या ७५ वर्षानंतर सुद्धा येथील नागरिकांना विकास काय असतो, तो कसा दिसतो हे माहीतच नाही.

शासनाद्वारे प्रत्येक गावाला जनतेच्या सोयीसाठी रस्ते, नाल्या, दवाखाने, अंगणवाडी, केंद्र शाळा , ग्रामपंचायत कार्यालय स्थापन करण्यात आले. पण तेथे स्थायी कर्मचारी राहत नाही. त्यामुळे अनेक नागरीकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावाच्या विकासासाठी कोट्यावधी निधी मिळतो परंतु जातो कुठे..? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अनेक गावांचे रस्ते असे आहेत की पावसाळ्यात पुलावरील पाण्याअभावी संपर्क तुटतो. अनेक गावातील रस्त्यावरील पुले पाण्याखाली जातात. त्यामुळे नागरिकांचा बळी गेला आहे. तालुक्यातील गावात आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे तालुक्याला यावे लागते. रस्त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तर काही रुग्णांचा रस्त्यातच जीव जातो. तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना शैक्षणिक वातावरण तालुक्यात मिळत नाही. त्यांच्या बिकट परिस्थिती, गरिबीमुळे बाहेर जाऊन शिकु शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक विकास होणार तरी कसा… या तालुक्यात आजही काही गावे उजेडापासून दूर आहेत. काहींना वीज आहेत तर वीजबिल मनमानी या कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रत्येक गावात सर्वांना शिक्षण, कायद्यानुसार गाव तिथे शाळा सुरू झाली. पण आज घडीला काही शाळा बंद पडल्या आहेत. काही गावात शाळा आहेत पण शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे शैक्षणिक प्रगती साधली जात नाही. तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रोजगारासाठी बाहेरगावी नागरिक पलायन करत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत जमिनीचे सातबारे नाहीत. त्यामुळे त्यांना शासनाकडून कृषी कर्ज मिळत नाही. शेतकरी सावकारी कर्जांना बळी पडून आत्महत्या करीत आहेत. राज्य सरकार असो की लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या हंगामात येऊन आश्वासने देऊन जातात. मग पाच वर्षे फिरून सुद्धा पाहत नाही. ज्या 2024 मध्ये आपल्याला जीवती तालुक्यातून भरघोस मतांनी तालुक्यातील शेतकरी, युवक, बेरोजगार, महिला या वर्गांनी अधिक मताधिक्याने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे. जिवती तालुक्याचा प्रश्न आपण मार्गी लावाल अशी तालुक्यातील जनतेची आपल्याकडून आशा आहे. अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या तालुक्यात विकास गंगा आणण्याची मागणी सुबोध चिकटे यांनी निवेदनातून नवनिर्वाचित खासदार धानोरकर यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here