औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मिळविलेल्या ज्ञान आणि कौशल्यावर उद्योग क्षेत्रात यश मिळवा – आ. किशोर जोरगेवार
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर चे आयोजन
युग बदलले आहे. हे युग तंत्रज्ञानाचे आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे. अशात विद्यार्थ्यांनी परिश्रम करत औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून मिळविलेल्या ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर औद्योगिक क्षेत्रात यश मिळवावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुगंठा, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, प्राचार्य आर. बी. वानखेडे, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, प्रज्योत नळे, बंडोपत बोढेकर, सुचिता झाडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजच्या गतिमान आणि तंत्रज्ञानावर आधारित जगात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान केले आहे. हे ज्ञान आणि कौशल्ये उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. परंतु, या ज्ञानाचा योग्य वापर करून आपले भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनीही अथक परिश्रम घेतले पाहिजे. या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि क्षमता ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्या क्षेत्रात आवड आणि उत्सुकता आहे हे ओळखल्यास कामाचा आनंद वाढतो आणि यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.
उद्योगातील गरजा समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्या तंत्रज्ञानाची मागणी आहे, कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत याची माहिती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यांचा विकास केल्यास संधी अधिक असल्याचे ते म्हणाले. शिकत राहणे आणि कौशल्ये वाढवणे आवश्यक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात, नवनवीन कौशल्ये आत्मसात करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असून आपल्या क्षमतेवर विश्वास ठेऊन परिश्रम केल्यास धैर्य, समर्पण आणि मेहनतीमुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते, असेही ते यावेळी म्हणाले. शासकीय औद्योगिक केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले जावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.