चनाखा येथील मामा तलाव खोलीकरणाचे काम बंद करा
सभापती विकास देवाळकर आणि ग्रामपंचायतेची जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार…
राजुरा (ता.प्र.) :– राजुरा तालुक्यातील मौजा चनाखा येथे मामा तलावाचे खोलीकरणाचे काम जलसंधारण विभागामार्फत चालू आहे. सदर खोलीकरणाच्या कामाबाबत ग्रामपंचायत चनाखा कडून कसल्याही प्रकारची नाहरकत घेतलेले नाही तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेतलेले नाही तसेच गौन खनिज नियमाचे उल्लंघन करून १० फुटांपेक्षा जास्त खोलीकरण सुरू असल्याचे दिसून येते त्यामुळे सदर खोलीकरणाचे काम हे नियमबाह्य आणि अवैध असून हे काम तातडीने बंद करण्यात यावे तसेच खोलीकरण करणाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा चनाखा ग्रामपंचायत चे सदस्य विकास देवाळकर आणि चनाखा ग्रामपंचायतने मा जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
तलाव खोलीकरणाच्या कामामुळे मोठ मोठे खड्डे पडल्याने भविष्यात ते धोकादायक ठरणार असून येथे मनुष्य तथा प्राणी यांचे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामातच एके दिवशी रात्री ट्रकच्या वाहतुकीने गावातील मेन लाईट ट्रकचा धक्यामुळे तुटुन विद्युत पुरवठा खंडित झालेला होता, सतत च्या वाहतुकीमुळे गावातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. येथे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर काम बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र याबाबत तक्रार दाखल करून अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही त्यामुळे चनाखा येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.