संविधान देशाच्या आत्मा : संविधान विरोधकांना त्यांची खरी जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ : आमदार सुभाष धोटे
चंद्रपूर : भारताचे संविधान देशाचा आत्मा आहे. संविधानामुळे आपले हक्क अबाधित आहेत. आज देशात न्याय, समता, बंधुता टिकाव धरून आहेत ते केवळ संविधानामुळे. संविधान बदलण्याची भाषा भाजप नेते करताना दिसत आहे. या संविधान विरोधकांना त्यांची खरी जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात चंद्रपूर जिल्ह्यात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने गावागावात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. जिल्हा काँग्रेस तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, रश्मी तिवारी, नम्रता ठेमस्कार, चंदा वैरागडे, भालचंद्र दानव, गोपाल अमृतकर, दिनेश चोखारे, मनीष तिवारी, सुनीता अग्रवाल उपस्थित होते.