राजुरा – गडचांदूर मार्गातील रेल्वे पुलाखालची स्वच्छता करण्याची मागणी
कापनगांव येथील रहिवाशांनी दिले प्रशासनाला निवेदन
राजुरा, दि.७ एप्रिल : राजुरा – गडचांदूर मार्गावरील रामपुर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या रेल्वे पुलाखाली रामपुर टर्नींग पॉईंटवर बसणारे मासविक्रेत्यांकडून कोंबडींचे पख, टाकावू मास सर्रासपणे फेकून दिले जात आहे. यामुळे रेल्वेपुलाखाली दुर्गंधीयुक्त अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. या मार्गावरुन जाणारे शेतकरी, नागरीक व लगत राहणाऱ्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रामपुर टर्नींग पॉईंटवर बसणारे मासविक्रेत्यांकडून दुर्गंधीयुक्त अस्वच्छतेचा नागरीक व शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेवून तातडीने स्वच्छता करण्यात येवून सदर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी संबंधीत व्यावसायीकांना ताकीद देण्याची मागणी कापनगांव येथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
सदर समस्येचे निवेदन तहसिलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, ग्रामपंचायत सचिव यांना देण्यात आले असून तातडीने समस्येवर तोडगा काढणार असल्याचे तहसिलदार यांनी आश्वस्त केले. रेल्वे पुलाजवळून शेतकऱ्याना बैलबंडी घेवून येतांना दुर्गंधीमुळे बैल बुजाडणे, बैल परत फिरणे असे प्रकार घडून येत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामाने ये-जा करणे मोठे कठीण झाले आहे. तसेच या दुर्गंधी व अस्वच्छेमुळे नागरीकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मासविक्रेत्यांच्या दुकानातील गर्दीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
समस्येचे निराकरण करण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते रतन काटोले, रोशन कावळे, एकनाथ मुठ्ठलकर, साईनाथ सातपुते, रोशन वाढई, सुमीत पिंपळकर, श्रीकृष्ण निवलकर, राजेंद्र मोरे, प्रभाकर कळंबे, मनोज झुंगरे आदींनी निवेदनातून प्रशासनाकडे मागणी केली आहे.