नगर परिषद राजुराद्वारे थकबाकी भरण्यात स्वारस्य न दाखविणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई

0
365

नगर परिषद राजुराद्वारे थकबाकी भरण्यात स्वारस्य न दाखविणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई

नगरपरिषद राजूराद्वारे मालमत्ता कर गाळे किराया व पाणीपट्टी थकविणाऱ्या शहरातील अनेक मालमत्ता धारक व गाळेधारकांवर दिनांक 15 मार्च 2024 रोजी धडक जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
राजुरा नगर परिषदेच्या थकीत मालमत्ता कराच्या आकड्यात दरवर्षी वाढ होत आहे , परिणामी नगर परिषदेला विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यामुळे नगर परिषदेने मालमत्ता कर व गाळे किराया तसेच पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर दि. १५ मार्च, शुक्रवारपासून धडक जप्तीची कारवाई सुरू केली आहे . शहरातील संजय गांधी मार्केट , सोमनाथपूर मार्केट , उईके मार्केट येथील एकूण आठ गाळेधारकांचे गाळे सील करण्यात आले . त्यापैकी पाच गाळेधारकांनी त्वरित गाळे किराया भरून आपले गाळे सोडवून घेतले . तसेच आठवडी बाजार वॉर्ड , सोमनाथपूर वार्ड , जवाहर नगर वॉर्ड येथील थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली . त्यापैकी अनेक मालमत्ताधारकांनी थकीत कराचा तात्काळ भरणा करून आपली मालमत्ता जप्त होण्यापासून वाचवली . राहिलेल्या गाळ्यांवर व इतर वॉर्डातील थकबाकीदारांवर येत्या दिवसात कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई करण्यासाठी नगरपरिषद राजूराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सुरज जाधव यांच्या मार्गदर्शनात विविध विभागाचे 35 ते 40 अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम सकाळपासूनच कार्यरत झाली होती.
या कारवाईमुळे राजुरा शहरातील थकीत मालमत्ता धारक , गाळेधारक व नळ धारक यांच्यामध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी तात्काळ नगरपरिषद कार्यालयात धाव घेऊन आपल्याकडील थकीत रकमेचा भरणा करून आपल्यावर होणारी जप्तीची कारवाई टाळण्याकरिता तत्परता दाखवली आहे.
दिवसभरातएकूण रु. 7,60,285/- एवढी रक्कम वसूल करण्यात आली.
शहरातील ज्या नागरिकांनी अद्याप थकीत मालमत्ता कर गाळे किराया तसेच पाणीपट्टी कर भरला नाही त्यांनी तो त्वरित भरावा अन्यथा त्यांना मालमत्ता जप्तीच्या तसेच गाळ्यांच्या सील करण्याच्या व नळ कनेक्शन कापण्याच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, व ही जप्तीची कारवाई पूर्ण कराची वसुली होईपर्यंत अशीच चालू राहील, त्यामुळे मालमत्ताधारकांनी , गाळे धारकांनी व नळधारकांनी आपल्याकडील थकीत व चालू रकमेचा तात्काळ भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here