चंद्रपूर तालुकास्तरीय उपकेंद्र स्तरावरील जन आरोग्य समितीचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
दि.21 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्टापी संस्था पुणे व प्रकृति महिला विकास केंद्र चंद्रपूर द्वारा चंद्रपूर तालुक्यातील संपूर्ण उपकेंद्र स्तरावरील जन आरोग्य समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी चंद्रपूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश पडगीलवार, जिल्हा RKS समन्वयक संतोष चात्रेश्वर, प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक निलेश देवतळे, जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक अक्षय देशमुख, उपकेंद्राचे CHO, तालुका समन्वयक मंगला घटे, सरपंच, आशा वर्कर पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी, ग्राम आरोग्य दूत व समिती सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत डॉ.निलेश पडगीलवार व जिल्हा RKS समन्वयक यांनी समिती बळकट करण्यासाठी सर्व समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा व लोकसहभागातून सरकारी आरोग्य यंत्रणा उत्कृष्ट दर्जाची करण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले.
प्रमुख प्रशिक्षक म्हणून जिल्हा समन्वयक निलेश देवतळे यांनी आरोग्यासाठी सामाजिक कृती कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगून, आरोग्य म्हणजे काय, आरोग्यावर परिणाम करणारे विविध घटक, आरोग्याची काळजी घेणे, समिती तयार करण्या मागची गरज, समितीचा निधी रुग्णाच्या कल्याणासाठी खर्च व्हावा, समितीचा उद्देश व ग्रामपंचायतने 15 वा वित्त आयोगाचा निधी आरोग्यावर खर्च करावा इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले.
तसेच जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक अक्षय देशमुख यांनी जन आरोग्य समितीची रचना, भूमिका, जबाबदाऱ्या, कार्य, निधी, बैठका, समितीमध्ये समुदायाचा सहभाग मिळवून समितीला बळकट करावे इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाचे संचालन मंगला घटे तर आभार अरुणा खोब्रागडे यांनी मानले. या प्रशिक्षणात मोठया संख्येने समिती सदस्यानी सहभाग घेतला.