खोटे व बनावट कागदपत्रा आधारे नियुक्ती देणाऱ्या रॅकेटचा लवकरच भांडाफोड!
पाचगाव येथील आशा सेविका नियुक्ती प्रकरण : माहिती अधिकारात उघड…
राजुरा – आर्थिक लाभाच्या लालसेने शास.निर्णयातील निकष धाब्यावर बसवून खोटे व बनावटी कागदपत्रे तयार करून नियुक्ती आदेश देणारे रॅकेट पंचायत समिती राजुरा मध्ये कार्यरत आहे. यात विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकाऱ्याचा समावेश आहे. या रॅकेटचे कारनामे लवकरच समोर येणार असा आरोप ग्रामपंचायत पाचगाव चे सदस्य बापुराव मडावी यांनी केला आहे.
पाचगाव येथील आशा सेविका निवडीसाठी तालुका आरोग्य अधिकारी यांचे २७-१-२०२३ च्या पत्रकान्वये ग्रामपंचायतीने इच्छुक महीला उमेदवारांचे अर्ज मागविले. दहा उमेदवारांनी अर्ज सादर केले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३ जुलै २००७ च्या शासन निर्णय व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान निकषानुसार ग्राम पोषण आहार व पाणी पुरवठा समितीने गुणानुक्रम देऊन पाच अर्ज तालुका आरोग्य अधिकारी कडे सादर करायचे आहे.परंतू आर्थिक देवाणघेवाणीची चटक लागलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निकषाला डावलून अर्ज परस्पर सादर केले. सदर बाब ग्रा.पं.चे जागरूक सदस्य बापुराव मडावी यांच्या लक्षात येताच त्यांनी डाव हाणून पाडला.
प्राप्त अर्ज ११-८-२०२३ ला पोषण आहार व पाणी पुरवठा समितीने शैक्षणिक पात्रता व अनुभव आधारे गुणानुक्रम दिले.१२-९-२०२३ च्या ग्रामसभेने ठरावासह तालुका आरोग्य अधिकारी कडे पाठविले. गुणानुक्रमा नुसार निवड करणे अपेक्षित असताना अधिकाऱ्याने कमी गुण असलेल्या उमेदवाराची नियुक्ती केली. एक उमेदवार संजिवनी कोटनाके हिला संशय आल्याने माहिती अधिकारात कागदपत्रे मागितले असता भयानक प्रकार समोर आला. काही उमेदवारांचे कागदपत्रे कार्यालयातून गहाळ करण्यात आले. तर नियुक्त केलेल्या उमेदवाराचे अनेक कागदपत्र बनावटी व खोटे असल्याचे दिसून आले.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संजिवनी कोटनाके व ग्रा.प. सदस्य बापुराव मडावी यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कडे केली. सखोल चौकशी करण्यास तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.या रॅकेट चा लवकरच भांडाफोड होणार आहे.
रॅकेटचा म्होरक्या (सुत्रधार) तालुका आरोग्य अधिकारी असून त्यांनी “रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही” योजना राबवित आहे. पाचगाव सह रामपुर, चुनाळा, गोवरी, देवाडा सह अनेक आशा निवडीत गैरव्यवहार केला असण्याची शक्यता आहे. नुकताच जिवती तालुक्यात झालेला गैरव्यवहार वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आला आहे. अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून दरमहा लाखोंच्या वर पगार मिळतो तरी ही या अधिकाऱ्यांना वरकमाईचा चटका लागला असल्याने बनावट कागदपत्रे तयार करून व पाठीशी घालून गैरप्रकार केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा बापुराव मडावी यांनी दिला आहे.