आपल्या कार्यकर्तुत्वाने महिलांनी समाजभूषण म्हणून स्वतःचे नाव लौकीक करावे : शुभांगी नक्षीने उंबरकर
विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
उद्याचे सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी महिलांवर आहे. याची जाणीव ठेवून महिलांनी खूप जबाबदारीने मुलांचे संगोपन केले पाहिजे.आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची पूर्ण मुभा द्यावी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ज्या विपरित परिस्थितीत स्वताला स्थापित केले याची आपल्याला कल्पना आहे. असे असताना आपण त्यांच्याकडून काय प्रेरणा घेत आहोत. समाजाला आपली गरज असताना आपण समाजाच्या हाकेला धावून जात नाही. मग सामाजिक समतोल आबादित कसा राहील? असे मत सौ शुभांगी नक्षीने उंबरकर यांनी व्यक्त केले.
रविवार दिनांक ४/२/२०२४ रोजी खेडुले कुणबी समाज भवन, तुकूम चंद्रपूर येथे पार पडलेल्या धनगर जमात सेवा मंडळ, पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला मंच, चंद्रपूर द्वारा आयोजित हळदीकुंकू व स्नेहमिलन समारंभात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
प्रतिभा काळे, सामाजिक कार्यकर्त्या तथा सदस्या ग्राम पंचायत, दाताळा यांच्या अध्यक्षतेखाली मकर संक्रांति निमित्त हळदीकुंकू व स्नेहमिलन समारंभ घेण्यात आले.
उद्घाटक म्हणून चंद्रपूर धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉ. यशवंत कन्नमवार, कोमल भागवत, क्राफ्ट इंस्ट्रक्तर इलेक्ट्रॉनिक्स विभाग गव्हर्नमेंट आयटीआय नागपूर, बेबीताई घोरुडे, आशा येवले, सुरेखा मंदे, ललिता गराट, पापिता येडे, ज्योती दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी कोमल भागवत यांनी आपल्या मनोगतात महिलांनी संपूर्ण घराच्या आरोग्याची निगा राखण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याची व स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याच महिला स्वतःला कमजोर समजून घरातल्या घरात डांबून घेतात. त्यामुळे त्या स्वताच्या कलागुणांना वाव देऊ शकत नाही. हा पराकोटीचा न्यूनगंड महिलांनी बाळगू नये. काळानुसार स्वतःला अपडेट ठेवावे. कारण जगाच्या तुलनेत आपण मागे पडलो तर आपला बळी जाईल. देवांना सुद्धा हत्ती, घोडा, वाघ या बलवान प्राण्यांचा बळी चालत नाही. तर बकऱ्याचा बळी चालतो म्हणजे तुलनेने कमजोर प्राण्यांचा बळी देवांना सुद्धा स्वीकार आहे. कोणत्याही क्षेत्रात स्वतः सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांनी योगासन व आहार याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन केले.
प्रमख पाहुणे डॉ. यशवंत कन्नमवार यांनी आपले विचार व्यक्त करताना महिलांनी आयोजन व नियोजन स्वतंत्रपणे सांभाळून सलग दुसऱ्या वर्षी हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वी करून दाखवला त्या बद्दल महिला पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा काळे आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांच्या उन्नतीचे द्वार संघटन असून महिलांनी वेळेचे योग्य मॅनेजमेंट करून काही वेळ समाजाच्या प्रगतीसाठी द्यावे. संघटन मजबूत असेल तर आपण आपले हक्क हिसकावून घेण्याची ताकद निर्माण करू शकतो व ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सुरेखा मंदे व ज्योती दरेकर यांनी यथोचीत विचार व्यक्त केले.
सरला परशुराम उगे यांची विदर्भ इमारत व इतर बांधकाम कामगार संघ चंद्रपूर जिल्हा मंत्रीपदी तसेच भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश या संघटनेत उपाध्यक्षपदी व वर्धा भंडारा गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी महिला प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
राष्ट्रमाता ही अमुची माता अहिल्या… जनहितासाठी तिने जीव अर्पीला… हे प्रेरणादायी गीत सुरेल आवाजात सादर करून सुषमा उगे यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा ढवळे व बंदिनी दरेकर यांनी केले प्रास्ताविक ज्योती पोराटे व मान्यवरांचा परिचय सुनंदा कन्नमवार यांनी करून दिला.आभार प्रदर्शन स्विटी ढवळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला मंचाची अध्यक्षा ज्योती दरेकर, उपाध्यक्षा कल्पना ढोले, सचिव सुनंदा कन्नमवार, सहसचिव शितल भूजाडे, कोषाध्यक्षा ज्योती पोराटे, प्रसिध्दी प्रमुख सुवर्णा ढवळे तसेच संघटिका व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.