सिद्धेश्वर नाल्यातून रेतीचा उपसा, महसूल विभागाची अनभिज्ञता…
राजुरा, १५ जाने. : सध्या संपूर्ण जिल्ह्यात रेती तस्करी हा विषय चर्चिला जात आहे. याकडे कमी दिवसात बक्कळ पैसा कमविण्याचा व्यवसाय म्हणून बरेच ट्रॅक्टर मालक गुंतले आहेत. तसेच रेती तस्करांची मुजोरी व तस्करांकडून होत असलेले हल्ले प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर नाल्यातून देवाडा व लक्कडकोट याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाच ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या ‘घुमजाव’ पणामुळे हे तस्कर प्रशासनालाच भारी पडतील की काय..? अशी शंका आहे.
शेकडो ब्रास रेतीची उचल करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असून नाल्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. परिणामी पर्यावरणाचे अतोनात नुकसान रेती तस्करांनी घडवून आणले आहे. पाण्याची पातळी खोलवर जात असून भविष्यात जंगली जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शिकवण देणारे शासन मात्र या मुजोर रेती तस्करांवर कारवाईसाठी पुढे येताना दिसत नसल्याने सुजाण नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दिवसाढवळ्या व रात्रपाळीत सुरू असलेल्या या रेती तस्करांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार का..? हे येत्या दिवसात नागरिकांना पाहायला मिळणार आहे.