पत्रकारावर हल्ला करणाऱ्या रेती तस्करावर तहसीलदारांकडून कारवाई
गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणले
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, आवारपूर, बिबी, गडचांदूर या औद्योगिक परिसरात मागील दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात विना खनिज परवाना अवैध रेतीची साठवणूक करून विक्री करण्याचा गोरखधंदा जोमात सुरू होता. या विरोधात अनेक वृत्तपत्रांमधून सातत्याने वृत्त प्रकाशित होत असल्याने बीबी येथील रेती तस्कर काशिनाथ शेरे यांचे कडून बातमीदार सतीश जमदाडे याला रेती तस्करीच्या बातम्या लावते म्हणून मारहाण करण्यात आली होती. रेती तस्कर काशिनाथ शेरे यांचे सह तीन जणांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेती तस्कराकडून पत्रकाराला मारहाण झाल्याने या प्रकरणाची तहसीलदार रंजीत यादव यांनी गंभीर दखल घेत विना गौण खनिज परवाना अवैध रेती तस्करी करणाऱ्या व्यावसायिकावर मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये कारवाई केल्या आहेत. दिनांक 12 जानेवारी च्या रात्री पहाटे 3 वाजताचे सुमारास बीबी येथील रेती तस्कर काशिनाथ शेरेला रेती तस्करी करताना पकडण्यात आले. यात विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून 1 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. पत्रकाराला मारहाण करणाऱ्या रेती तस्करावर कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्याने परिसरातील अवैद्य गौण खनिज परवाना वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
राज्यमार्गांवरच चालतो रेती तस्करीचा खेळ
गडचांदूर वणी राज्य मार्गावर बीबी ग्रामपंचायतीचे हद्दीत दुर्गा माता मंदिर समोर वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा करून नंतर चढ्या दराने विक्री करण्याचा गोरखधंदा मागील दोन वर्षापासून सातत्याने राजरोसपणे दिवसाढवळ्या सुरू होता. तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस विभागाने आजपर्यंत याठिकाणी कुठलीही कारवाई केली नाही. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता अधिकारी सांगायचे की आम्ही जेव्हा जातो तेव्हा मंदिराच्या कामाकरिता रेती आणली असे उत्तर देण्यात येत असल्याने आम्ही कधी कारवाई केली नाही. मंदिराच्या बांधकामाचा आडोसा घेत रेती तस्करीचा गोरखधंदा केला जात होता. येथील रेती साठवणुकी बाबत वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने पत्रकाराला मारहाण करण्यात आली. पत्रकाराला मारहाण झाल्यावरही पोलीस विभाग, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रेतीसाठ्यावर धाड टाकून कारवाई केली नाही. नव्याने रुजू झालेले तहसीलदार रंजित यादव यांनी तक्रारीची दखल घेत मोठ्या शिफातीने पहाटे 3 वाजताच्या सुमारास हायवा द्वारे रेती उतरविताना कारवाई केली. तहसीलदारांच्या धाकड कारवाईने परिसरातील रेती तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
पत्रकाराला मारहाण, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद हास्यास्पद
गडचांदूर नगर परिषदचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद जोगी याने दैनिक देशोन्नती चे कोरपणा तालुका प्रतिनिधी गणेश लोंढे यांचा मोबाईल हिसकावून तो आपटून खुर्चीने मारहाण केली. पत्रकाराचा मोबाईल हिसकावून आपटून फोडण्यात आला. खुर्चीने मारहाण करण्यात आली. सदर घटना 2 पत्रकारा समोरच घडली. या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत शरद जोगी यांचे वर गुन्हा दाखल करण्याऐवजी गडचांदूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करणे हास्यास्पद वाटत असून राजकीय वलय असल्याने गडचांदूर पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली नाही. गडचांदूर पोलिसांना पत्रकार संरक्षण कायद्याचा विसर पडला की काय असे मत अनेकांनी व्यक्त केले. कुठलीही शासन बांधकाम परवानगी न घेता गडचांदूर नगरपरिषद चा उपाध्यक्ष टोली जंग इमारत उभी करतो. वाहनांकरिता कुठलीही पार्किंग व्यवस्था नाही. गडचांदूर नगरपरिषद चा उपाध्यक्ष असल्याने व राजकीय वलय असल्याने प्रशासनिक अधिकारी शरद जोगी यांचे विरोधात कुठलीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती प्रतिनिधी गणेश लोंढे यांनी दिली आहे.
तस्करांची गय केली जाणार नाही
विना गौण खनिज परवाना वाळू मुरूम, तस्करी, गिट्टी वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. बिबी ग्रामपंचायतचे हद्दीत पहाटे 3 वाजता चे सुमारास विना गौण खनिज परवाना 9 ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून हायवा व बिना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. हायवा मालकाकडून 324800 रुपये व ट्रॅक्टर ट्रॉली मालकाकडून 115600 रुपये दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वाळू तस्करी रोखण्याकरिता संपूर्ण तालुक्यात वेगवेगळी पथके नेमण्यात आली असून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. रेती तस्करांकडून पत्रकारांना मारहाण करणे योग्य नाही. अशी माहिती कोरपना तहसीलदार रणजित यादव यांनी दिली आहे.