विविध मागण्यांसाठी राजुरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संपावर…
विरुर स्टेशन/अविनाश रामटेके
विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेला बेमुदत संपात राजुरा तालुका रास्तभाव दुकानदार संघटना सहभागी होत तहसील कार्यालय राजुरा येथे मोर्चा काढण्यात आला. त्यामुळं रेशन कार्ड धारकांना याचा फटका बसू शकतो. तेव्हा लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदन देऊन दुकानदारांकडून मागणी करण्यात आली.
राजुरा तालुक्यात सद्या 108 स्वस्त धान्य दुकान आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, पूर्ण मार्जिनची रक्कम निर्धारित वेळेत देण्यात यावी, प्रति क्विंटल 300 रुपये मार्जिन देण्यात यावी, प्रति महिना व्यवस्थापन खर्च 5 हजार रुपये देण्यात यावा. तसेच वितरण तूट मंजूर करावी. स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
सदर संप बेमुदत राहणार असून या कालावधीत धान्य स्वीकारणे, धान्य वितरीत करणे व शासनाला माहिती पुरविणे ही सर्व कामे बंद राहणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पाल यांनी दिली.
यावेळी विठ्ठल पाल, मंगेश गुरनुले, विनायक महकुलकर, प्रदीप भावे, अविनाश रामटेके, अनिल नगराडे, वसंता बारसागडे, लड्डू पाटील, विलास किनाके, वसीम भाई, नितीन भोंगडे, शांताराम बोबाटे असे राजुरा तालुक्यातील इतर रास्तभाव दुकानदार उपस्थित होते.