15100 टोल-फ्री क्रमांकावरुन मिळवा मोफत कायदेविषयक सल्ला
चंद्रपूर, दि. 08 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त 15100 हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन करून कायदेविषयक सल्ला हवा असल्यास तज्ञ वकिलांमार्फत दिला जातो. सदर टोल-फ्री क्रमांकाचा लाभ भारताचा कोणताही नागरीक सहजपणे घेऊ शकतो.
जिल्ह्यातील नागरीकास कायदेविषयक सल्ला हवा असल्यास त्याने टोल-फ्री क्रमांकावर फोन करावा. त्यानंतर राहत असलेले राज्य, जिल्हा व तालुक्याची निवड करावी. तसेच संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथील पॅनलवर कार्यरत असलेल्या वकिलांशी फोनवरून संपर्क करता येऊ शकतो. याकरीता महिला किंवा पुरुष वकील असा विकल्प सुद्धा उपलब्ध आहे.
सदर सेवा कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य नाही किंवा केवळ सल्ला स्वरूप कायदेविषयक माहिती हवी आहे, अशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.