नाताळ सण प्रेम, शांती आणि करूणेचा संदेश घेऊन येतो! – देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन
भाजपकडून घुग्घुस येथील विविध चर्चना भेटी व ख्रिस्ती धर्मीयांना शुभेच्छा
घुग्घुस, दि. २५ डिसेंबर
आज नाताळच्या (ख्रिसमस) निमित्ताने शहरातील न्यू अपोस्टोलिक, एस. टी.थॉमस सी. आय. एन, बिलिवर्स आणि शालोम गोस्पेल या चर्चमध्ये राजुरा विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात शहर भाजपकडून भेटी देत उपस्थित ख्रिस्ती धर्मीयांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलिस निरिक्षक आसिफ राजा शेख, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,माजी सरपंच संतोष नुने, माजी जि. प. सदस्य चिन्नाजी नलभोगा, विनोद चौधरी, माजी ग्रा. पं. सदस्य साजन गोहने, सिनु इसारप, हसन शेख, सुरेंद्र जोगी, मारोती वांढरे ,विजय पचारे यांचेसह ठिकठिकाणी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवाची उत्साहपूर्ण उपस्थिती पाहायला मिळाली.
याप्रसंगी न्यू अपोस्टोलिक चर्च मध्ये शुभेच्छापर बोलतांना देवराव भोंगळे म्हणाले की, ख्रिस्ती धर्मीयांचा महत्वपूर्ण सण असलेला नाताळ हा संपुर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; खरंतर प्रभू येशूच्या जन्माचा आनंद द्विगुणित करीत साजरा होणारा नाताळ प्रेम, शांती आणि करूणेचा संदेश घेऊन येतो. भारतात अनेक जातीधर्माचे लोक एकत्र राहतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या घुग्घुस शहरातही देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व धर्माचे बांधव मोठ्या गुण्यागोविंदाने एकोप्यात राहतात. सर्व धर्माचे सणोत्सव आपण सर्व मिळून साजरे करतो, एकमेकांच्या सुखदुःखात सामिल होतो त्यामुळे संबंध चंद्रपूर जिल्ह्यातही सामाजिक समरसतेचे द्योतक म्हणून घुग्घुस शहराची ओळख आहे. हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे.
पुढे बोलताना, जे भक्त प्रभू येशू मसिहा प्रती श्रद्धा ठेवतात त्यांना कायम चांगले कार्य करण्याची सकारात्मक उर्जा मिळते. घुग्घुस शहराच्या विकासासाठी देखील आम्हाला निमित्यमात्र ठेऊन प्रभूने शहरवासीयांची सेवा करण्याची आम्हाला संधी दिली आहे. सेवा आणि करूणेच्या याच तत्वावर आजही आमचे सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहेत. कालपासून आपण सर्व ख्रिस्ती बांधवांनी या आनंददायी नाताळची सुरुवात केली, काल घुग्घुस शहरामध्ये मिरवणुक काढून संपूर्ण शहरात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण केले त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन करीत पुणःश्र्च सर्वांना नाताळच्या मनापासून शुभेच्छा देतो. असेही ते म्हणाले.