चक्क ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारासमोरच अनाधिकृत लेआउट
औद्योगिक नगरी नांदा येथील प्रकार
गुंठेवारीने शेत जमिनीची विक्री शासनाच्या महसुलाला लागतोय चुना
कोरपना :- शेत जमीनीवर लेआऊट काम टाकतांना महसूल विभागासह स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते परंतू चक्क नांदा ग्राम पंचायत प्रवेश द्वारा समोरच कुठलीही शासन परवानगी न घेता कृषक जमीनीवर अनाधिकृत लेआउट टाकून प्लाट विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे मात्र संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
नांदा येथील शेत सर्वे क्र. ११/२ मधील कृषक जमिनीवर भूमाफियाकडून शेत घेऊन अनधिकृत लेआऊट टाकून गुंठेवारी पद्धतीने सर्रास प्लाट विक्री सुरू आहे. याकडे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन व महसूल विभागाने सुट दिल्याचे दिसून येत आहे. नांदा ग्रामपंचायत प्रवेश द्वारा समोरच चक्क अनाधिकृत लेआऊट टाकून प्लॉट विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याने ग्राम पंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे शेत सर्वे क्र. ११/२ खाते क्र. १२०७ ही जागा जुन्याच मालकाच्या नावाने असून अजूनही फेरफार झालेली नाही. तसेच कृषक जमीन अकृषक करणे बंधनकारक असते असे इथे दिसून येत नाही. महसूल विभागाची परवानगी नसताना अशा प्रकारे अनाधिकृत लेआऊट टाकून गुंठेवारी पद्धतीने प्लाट विक्री सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसुल बुडत असला तरी स्थानिक महसूल प्रशासनाचा आशीर्वादानेच भूमाफियाचा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा जनमानसात आहे.
भूमाफियांच्या चौकशीकडे लक्ष
नांदा परिसरात असे जवळपास चार ते पाच ले-आउट आहे. जेथे कोणतीही शासकीय परवानगी न घेता गुंठेवारी पद्धतीने जागेची विक्री सर्रासपणे केली जात आहे. स्थानिक स्तरावर स्टॅम्प ड्युटीनुसार विक्री करून अनेकांनी पक्की घरेसुद्धा बांधलेले आहे.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ व पिंपळगाव रोड नांदा फाटा येथे अनाधिकृत प्लॉट पाडण्यात आले असून जोमाने जागेची विक्री करीत आहे.
खुलासा मागवून कारवाई करणार
ग्रामपंचायत च्या गेट समोरच लेआउट टाकल्याचे दिसते या संबंधाने ग्रामपंचायत ची कुठली परवानगी घेतलेली नाही गुंठेवारी पद्धतीने विक्री करण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे लेआउट धारकाला नोटीस पाठवून खुलासा मागणार असून तहसीलदारांना पत्र देऊन माहिती कळवीत आहे.
– श्रीहरी केंद्रे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत नांदा
स्थानिक तलाठी मात्र मौन
अनधिकृत लेआउट टाकून प्लॉट विक्रीचा गोरख धंदा सुरू असताना येथील तलाठी मात्र मौन बाळगून आहे तलाठ्याने त्यांचे वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे परंतु तसे झालेले दिसत नाही.
– प्रफुल बोढाले, तंटामुक्ती अध्यक्ष, नांदा
काम बंद करून कारवाई करणार
माहिती मिळाल्यानंतर लेआऊट धारकाला काम बंद करण्याकरिता सांगितले आहे वरिष्ठांना माहिती देऊन योग्य ती कारवाई केली जाईल. – विकास चीने, तलाठी, साजा नांदा