गोवंश तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, जनावरांसह दहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल घेतला ताब्यात
राजुरा, १३ डिसें. (ता.प्र.) :- गोवंशीय जनावरे ट्रक मध्ये कोंबून तेलंगणात कत्तलीसाठी नेत असताना राजुरा पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रक सह ३६ जनावरे ताब्यात घेतली. ट्रक सोडून पळून गेलेल्या अनोळखी वाहन चालका विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे चोर पावलांनी तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, १२ तारखेला रात्री राजुरा पोलीस गस्त घालत असताना मिळालेल्या खबरी नुसार बल्लारशाह कडून येणारा ट्रक नाकाबंदी करून रात्री २:३० वाजता थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने ट्रक न थांबविता गडचांदूर रोड ने घेऊन पळून गेला. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग केला. सदर वाहन सास्ती टी पॉइंट जवळ परत थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन ट्रक सोडून पसार झाला.
वाहनाची झडती घेतली असता त्यात बैल चार नग (अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये), गायी अकरा नग (अंदाजे किंमत एक लक्ष दहा हजार रुपये), कालवड आठ नग (अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये), गोरे तेरा नग (अंदाजे किंमत एक लक्ष चार हजार रुपये) व टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक क्रमांक MH 40 BL 6721 (अंदाजे किंमत आठ लक्ष रुपये) असा एकूण दहा लक्ष ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, पांडुरंग हाके, नरेश उरकुडे, सचिन पडवे, दत्तात्रय लेनगुरे, राजेश ताजने यांनी पार पाडली. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहे.