जिल्ह्यात 1582 पथकामार्फत होणार कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान

0
534

जिल्ह्यात 1582 पथकामार्फत होणार कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान

20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत मोहीम

चंद्रपूर, दि. 8 : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन 2023-24 या वर्षात दि. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सदर कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची कुष्ठरोग व क्षयरोगाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर, संशयीत कुष्ठरुग्णांची व क्षयरुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेकरीता कृती नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 18,34,245 लोकांचा सर्व्हेद्वारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेणार आहे. एकूण 1582 पथकामार्फत हि शोध मोहिम राबविल्या जाणार आहे.

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे तसेच समाजात क्षय व कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सदर कार्यक्रम हा जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. तसेच निदानित झालेल्या कुष्ठरुग्णांना मोफत औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे मिळणार आहे. नागरिकांनी या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सीईओकडून आढावा
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरोग व क्षयरुग्ण शोध अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दि. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेतील जनपद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हास्तरीय समन्वय समितीचा आढावा घेतला.

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ललितकुमार पटले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश खंडारे, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पराग जीवतोडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक धर्मदास पाली आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here