स्मशानभूमीच्या जागेसाठी ग्रामस्थांची तहसील कार्यालयावर धडक…
कोरपणा : भारत देश स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर ग्रामीण भागात स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहाची विटंबना होत असल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात घडली आहे.
एका धनिकाने गावातील राखीव जागेवर अतिक्रमण करून आपल्या नावावर पट्टा लावला. आता गावकऱ्यांमध्ये एखादा मृत्यु झाला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही. या लढ्याला कमी-जास्त दीड महिना होऊन गेला. सातत्याने ग्रामस्थ पाठपुरावा करत असूनसुद्धा अजून पर्यंत गावहिताचा निर्णय लागला नाही. ही गोष्ट प्रसारमाध्यमांनी लक्षात आणून दिली. मत्र्म असंवेदनशील स्थानिक प्रशासनाने यावर अजून पर्यंत निर्णय दिला नाही. रोज ‘यांना भेटा, त्यांना भेटा…’ यामध्येच दीड महिना निघून गेला.
आता प्रशासन म्हणते की, आम्ही तुम्हाला दुसरी वेगळी जागा उपलब्ध करून देऊ. आणि ज्याने अतिक्रमण करून पट्टा आपल्या नावाने केला त्याला संरक्षण देऊ. म्हणजे स्मशानभूमीचा ज्या जागेचा 7/12 आहे. त्याला प्रशासन दुसरीकडे नेत आहे. पण त्याचा पट्टा खाली करत नाही याला काय म्हणायचं? हा यक्षप्रश्न निर्माण झाला असून प्रशासन त्या धनिकासमोर गुडघे टेकले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उपविभागीय अधिकारी साहेबांनी लिहून दिले की, आम्ही त्याचा पट्टा खाली करून देऊ आणि त्याने जर अंत्यसंस्कार करण्यामध्ये अडचण निर्माण केली तर त्यावर कार्यवाही करू. पण आता त्यांच म्हणणं अस आहे की, तुम्ही माझ्यावर केस करू शकता? म्हणजे ते गावकऱ्यांना कोर्टात जाण्याचा पराक्रम करत आहेत.
सदर वादातील स्मशानभूमी जागेचा भूमापन क्रमांक 21 मध्ये एकूण 14 एकर जमीन गायरान आहे. त्यामध्ये गावकऱ्यांची मागणी फक्त 1 एकर चीच आहे. मात्र यावर प्रशासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांत प्रचंड असंतोष दिसून येत आहे. याची माहिती प्रशासन व लोकप्रतिनिधी या सर्वांनाच आहे. पण अजून कोणीही गावहिताच्या निर्णयामध्ये प्रमुख भूमिका घेऊन गावकऱ्यांना दिलासा देताना दिसून येत नसल्यामुळे प्रशासन उंटा वरून शेळ्या हकण्याचा महत पराक्रम करताना दिसून येत आहे. यावर कोणती भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.