कार्ड रूम (क्लब) ला परवानगी न देण्याच्या विनंतीला केराची टोपली…
वरदहस्त कोणाचा ; शालेय प्रशासन व स्थानिक नागरिकांत प्रचंड असंतोष
क्लब बंद करावा अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
वरुर रोड (राजुरा), २२ सप्टें. : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात मोठा क्लब सुरू असून यामुळे स्थानिक जनता व विद्यार्थांना मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. वरुर रोड येथील क्लबवर मे २०२३ मध्ये तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर क्लबचा परवाना रद्द करत टाळे ठोकले होते. यावेळी ग्रामीण भागात क्लबला परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री व जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या विनंतीला केराची टोपली दाखवत पुन्हा नव्याने वरुर रोड येथील क्लब ला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण सौहार्द बिघडून जनतेत व विद्यार्थ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सदर क्लब वर कारवाई करून तातडीने बंद करण्यात यावा अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
वरुर रोड येथे क्लब सुरू करण्यात आल्याच्या ठिकाणापासून जवळच ख्रिश्चन प्रार्थना स्थळ, तेरा प्रेम चर्च, लूर्थ विद्या मंदिर, इंदिरा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय लागून आहे. नर्सरी ते माध्यमिक शालेय विद्यार्थी यासह गावातील तरुण यावर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोरंजनाच्या नावाखाली येथे क्लब ला परवानगी देण्यात आली असून यात एकही स्थानिक नागरिक सदस्य नाही. याठिकाणी तेलंगणा व आंध्रप्रदेश येथील नागरिक जुगार खेळण्यासाठी चारचाकी वाहने घेऊन येत असून यात लाखाच्या घरात जुगार चालतो. याचा वाईट परिणाम स्थानिकांवर होत असून परिसरातील शालेय मुले जुगाराच्या आहारी जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिक नागरिक चिंतित आहेत. यामुळे चोऱ्या, मारामारी, गुंडागर्दी, महिलांची छेड व एकंदरीत सामाजिक विघातक कृत्यास मोकळे रान मिळत असल्याची चिंता स्थानिक नागरिक व शालेय प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
या रस्त्याने मोठी वाहतूक सुरू असते. जुगार खेळणाऱ्या शौकिनांची भरधाव वाहनाने अपघातही घडू शकतात. सिगारेट व मद्यधुंद वातावरणामुळे परिसरातील युवकही भरकटत दिशाहीन होण्याची दाट शक्यता आहे. परिसरातील काही नागरिकांना याचा शौक लागल्यास किंवा जुगाराच्या आहारी गेल्यास आज ना उद्या अल्पावधीत बक्कळ पैसा जिंकेन या आशेने संपुर्ण कुटुंबाची राख-रांगोळी होण्यास मोकळी वाट या क्लब ने मिळाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. याचे दूरगामी गंभीर परिणाम लक्षात घेता सदर क्लब बंद करून परवाना रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. हा जुगार दिवसरात्र सुरू असतो. रात्री १२ वाजेपर्यंत या ठिकाणी रेलचेल दिसून येते. या मार्गाने शाळकरी, विद्यालयीन, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, शेतकरी, मजूर, महिला यांची ये-जा असते. यामुळे नशेत असलेल्या जुगारांकडून दुष्कर्म घडल्यास जबाबदार कोण? हा खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्णतः डबघाईस चालली की काय? हा महत प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
सदर क्लब विरुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असून मटका किंग वेंकटेश, राजेश्वर, त्याचे दिडशे साथीदार व जागा मालक यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात अवैध तेरा पत्ता रमी, मटका, जुगार चक्री, काठी, घोडी, अंदर बाहर, सोरट मनोरंजनाच्या नावाखाली सुरू आहे. याप्रकरणी जनहितार्थ तातडीने कारवाई करून क्लब बंद करण्याची मागणी मंत्रालय मित्र चे संपादक यांनी निवेदनातून मुख्यमंत्री यांच्याकडे केली असून या मागणीमुळे जीवितहानी नुकसान होण्याची शक्यता असल्याने व सदरची गंभीर बाब पाहता स्वतः व परिवारास सुरक्षाही मागितली आहे. सदर क्लब सुरू न करण्याची विनंती केल्यानंतरही हा क्लब कोणाच्या वरदहहस्ताने सुरू करण्यात आला, हे अनाकलनीय कोडे आहे. पुन्हा परवानगी दिल्याने वरुर रोड, टेंबुरवाही येथील नागरिक, लुर्थ माता विद्या मंदिर, तेरा प्रेम चर्च सोसायटी, इंदिरा विद्यालय यांच्याकडून जिल्हा प्रशासनाकडे सदर क्लब तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या भूमिकेकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.