विविध मागण्यांना घेऊन निघालेल्या ओबीसी समाजाच्या मोर्च्यात आमदार किशोर जोरगेवार झाले सहभागी
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन आज ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे सहभागी झाले. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाची भावना समजून घेत त्या राज्य सरकार पर्यंत पोहचविणार असल्याचे म्हटले आहे.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला – मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच भेट दिली होती.
दरम्यान आज सदर मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह मोर्च्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, ग्रामीण तालुकाध्यक्ष राकेश पिंपळकर, नितेश गवळी, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.