सामर्थ्यशाली आणि सुसंस्कृत विद्यार्थी घडविणारे शिक्षकच समाजाचा आदर्श – आ. किशोर जोरगेवार

0
520

सामर्थ्यशाली आणि सुसंस्कृत विद्यार्थी घडविणारे शिक्षकच समाजाचा आदर्श – आ. किशोर जोरगेवार

जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त जिल्हा शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

आजचे युग स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकून विद्यार्थ्यांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. अशात आई वडिलांसाह शिक्षकांची भुमिकाही महत्वाची आहे. शिक्षणाबरोबरच सामर्थ्यशाली आणि सुसंस्कृत विद्यार्थी घडविणारे शिक्षकच समाजासाठी खरा आदर्श असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद येथे जिल्हा शिक्षक पूरस्कार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉनसन, शिक्षण अधिकारी राजकुमार हिवारे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सुभाष पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, मुख्य अधिकारी अतुल गायकवाड, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रियंका रायपूरे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षकाला मोठे महत्व आहे. शिक्षक केवळ शिक्षकाच्या भूमिकेला चिकटून राहत नाही. गरज पडेल तेव्हा ते विविध भूमिकांमध्ये जुळवून घेतात. आपण दुःखी असतो तेव्हा ते आपले मित्र बनतात, जेव्हा आपण दुखावतो तेव्हा ते आपल्या पालकांप्रमाणे आपली काळजी घेतात. त्यांच्या याच भूमिकांमुळे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव टाकत विद्यार्थ्यांना आकार देण्याचे काम करत असतात. त्यामुळे गुरुला सर्वोच्च स्थान दिल्या गेले आहे. गुरु शिवाय आयुष्याला आकार मिळणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आदर्श शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि समर्थन दिले पाहिजे. गरजेप्रमाणे पाठीवर थाप दिली पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत केली पाहिजे. असे ते यावेळी बोलतांना म्हणाले.
आज ज्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचे ईश्वरीय काम या शिक्षकांच्या वतीने केल्या जात आहे. कमी संसाधन असुनही केवळ ईच्छा शक्तीच्या जोरावर आपण विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहात. हे कौतुकास्पद आहे. आपण आता येथेच न थांबता राज्य पातळीवरील पुरस्कार मिळविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करावे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पूरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here