राजुरातील अवैध दारू विक्रीला अबकारी विभागाचाच आशीर्वाद…
कुंपनच शेत खातंय, मग न्याय कोण देणार..?
राजुरा ( प्रतिनिधी) : राजुरा शहरात व तालुक्यात आझाद चौकातील एका दारू विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात व शहर परिसरात अवैधरित्या दारूचा पुरवठा होत असून सकाळी साडेचार वाजता पासून दारूची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र अबकारी विभाग किंवा पोलीस विभागाचे अधिकारी ह्यांनी चौकशी सोडा साधे कोणी तिकडे फिरकतानाही दिसत नाही. यावरून कोळशाप्रमाणे अवैध दारू विक्री ही आता संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण केल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल अशी चिंता सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.
आझाद चौकातील हा दारू विक्रेता चक्क तीन स्कुटी व एका पिकअप वाहनाद्वारे संपूर्ण ग्रामीण भागात दारूचा पुरवठा करत असून त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे व अनेक गुन्हे दाखल असलेले व्यक्ती त्यांनी या कामासाठी नियुक्त केले आहे. मुळात मद्य खरेदी व विक्री चा हिशोब ठेवावा लागत असताना ह्या विक्रेत्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात दारूचा स्टॉक कुठून येतो? ही दारू वैधरित्या खरेदी करण्यात येत आहे का? व ह्याच्या विक्रीचा हिशोब ठेवला जात आहे का? ह्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पण संबंधित विभाग डोळेझाक करत असल्याने ‘कुंपनच शेत खातंय’ हे सिद्ध होतंय. त्यामुळे ह्या सकाळी मद्य प्राशन करून गावात व शहरात वातावरण बिघडवणाऱ्या मद्यापिंवर अंकुश येईल ही अपेक्षा ठेवणे मुर्खपणा असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
ह्यासंदर्भात अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याच्या उद्देशाने संबंधित विभागाला भेट दिली असताना आणखी धक्कादायक माहिती प्राप्त झाली. कार्यालयात प्रवेश करताच एक पोलीस शरीर यष्ठी चा तरुण व एक कर्मचारी उपस्थित होता. सदर युवकाविषयी माहिती घेतली असता सदर युवक विभागाचा मुखबिर असल्याची व विभागाद्वारे दारू विक्रेत्यांच्या संपर्कात राहण्याची भूमिका पार पाडत असल्याची माहिती मिळाली. परंतु हा युवक स्वतःच आपल्या गावात दारूची अवैध विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून अबकारी विभागाचे नेमके कार्य काय व ते कुठले कार्य पार पाडत आहे. ह्या बाबत संभ्रम निर्माण झाला असून राजुरा व ग्रामीण भागात होत असलेल्या ह्या अवैध दारू विक्री व अबकारी विभागाबाबत उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई ह्यांच्याकडे तक्रार केली असल्याचे मनसे राजुरा तालुकाध्यक्ष आदित्य भाके ह्यांनी सांगितले आहे.
ग्रामीण भागात व शहरातील जवळपास सर्वच वार्डात ठराविक व्यक्तींकडे दारूचा पुरवठा कुठून येतो याची माहिती अबकारी विभागाला होऊ नये, हे महाआश्चर्य आहे. यामुळे महिला व नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता आतातरी राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग येते का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.