कापसाची होळी करत वंचितचे राजुरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन…

0
597

कापसाची होळी करत वंचितचे राजुरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन…
तहसीलदार चर्चेसाठी तयार नसल्याने केले ठिय्या आंदोलन


राजुरा, ८ जून : तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी करत वंचित बहुजन आघाडीने आज गुरुवारी सत्याग्रह आंदोलन केले आहे. मात्र तहसीलदार चर्चेसाठी तयार नसल्याने आंदोलन चिघडले व आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसरातच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आंदोलन चिघळत असताना तहसीलदारांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत चार दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचितचे चंद्रपुर जिल्ह्यातील नेते तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे वंचितचे उमेदवार भूषण फुसे मैदानात उतरले असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बी बियाणांचा काळा बाजार सुरू असून कृषी विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तसेच फवारणी औषधी व खतांच्या किमतीत शासनाने भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांची भरमार आर्थिक लयलूट सुरू आहे. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कापसाला व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने रोष व्यक्त करत तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून शासनाच्या धोरणांचा निषेध केला. तसेच तहसील कार्यालय परिसरात कापसाची होळी करण्यात आली. बोगस बी-बियाणे उत्पादन व विक्री करणाऱ्यावर कारवाई करा, शेतकऱ्यांना बी बियाणे 50 टक्केवर उपलब्ध करून द्या, अन्यथा व्यापाऱ्यांच्या गोडावूनला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करू असा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे वंचितचे उमेदवार भूषण फुसे यांनी दिला आहे.

यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, गोंडपिपरी तालुका निरीक्षक भगीरथ वाकडे, तालुका अध्यक्ष सुशील मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष हजारे, युवा कार्यकर्ते अभिलाष परचाके यांच्यासह वंचितच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here