शाळकरी मुले, विद्यार्थी आणि खेळाडूंना ताडोबा अंधारी व्याघ्र-प्रकल्प सफारीत सुट, प्रस्तावित टायगर सफारी करिता नवे कंत्राट
आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर वनमंत्री यांनी लावली बैठक
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा अभयारण्यबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते. या संदर्भात आज मुंबई येथे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी बैठक लावली. यावेळी शाळकरी मुले, विद्यार्थी आणि खेळाडू यांना ताडोबा सफारीत सुट दिल्या जाणार तसेच प्रस्तावित टायगर सफारी करिता नवे कंत्राट काढले असल्याची माहिती वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
या बैठकीला चंद्रपूर मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार, वन विभागचे प्रधान सचिव रेड्डी, वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनरक्षक महिप गुप्ता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्यासह संबंधित अधिका-र्यांची उपस्थिती होती.
नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी तोडाबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा संदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. यात महाविकास आघाडीच्या काळात 286 कोटी रुपयांची मंजुर झालेली टायगर सफारीचे काम लवकर सुरु करण्यात यावे, ताडोबा सफारी करिता स्थानिकांना सुट देण्यात यावी, मृत पावलेल्या प्राण्यांचे अस्तित्व साबुत ठेवत संरक्षित पुतळे तयार करण्यात यावे आदी मागण्या केल्या होत्या.
या मागण्यांसदर्भात आज मुंबई मंत्रालय येथे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी बैठक लावली होती. यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपुरात ताडोबा सफारी करीता येणारा पर्यटक हा ताडोबा पाहून निघून जातो. मागच्या वर्षी एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत २ लाख ८२ हजार ६१२ पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. यात ५ हजार १३ विदेशी पर्यटकांची संख्या आहे. त्यामुळे इतका मोठ्या संख्येने येथे येणारा पर्यटक येथून परत न जाता त्याने येथील इतर पर्यटन क्षेत्रालाही भेट दिली पाहिजे. याकरिता महाविकास आधाडी सरकारच्या काळात प्रस्तावित रोजगार निर्मिती साठी महत्वाची असलेली ताडोबा टायगर सफारीचे काम लवकर पूर्ण करावे असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी विद्यार्थी, दिव्यांग आणि खेळाडूंना ताडोबा सफारी करीता सुट दिल्या जात असल्याचे ना. मुनगंटीवार म्हटले आहे. तसेच यावेळी स्थानिकांनाही सुट देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रस्तावित व्याघ्र सफारीच्या कामाचे टेंडर काढण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सोबतच येथे अहमदनगरच्या धर्तीवर प्राण्यांचे 3D रिसर्च सेंटर तयार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले असून सदर टायगर सफारी जिल्हासाठी गौरव ठरणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.