उपचाराअभावी गायीचा मृत्यू, पशु वैद्यकीय दवाखान्यांनाच उपचाराची गरज…
विहिरगाव (राजुरा), ५ एप्रिल : विहिरगाव येथील शेतकरी मनोहर माधव तेलंग यांच्या गायीला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची गाय दगावली. यामुळे सदर शेतकऱ्याचे २५ हजार रुपये पशुधनाचे नुकसान झाले.
विहीरगाव येथील तेलंग यांची गाभण गायीने एका वासराला जन्म दिला. मात्र या काळात गायीची प्रकृती बिघडली असता तेलंग यांनी पशु वैद्यकीय अधिकारी यांना आज सकाळी ७ वाजता फोन केला. तेव्हा डॉक्टरांनी अर्ध्या तासात येईल असे सांगितले. मात्र ते ९:३० वाजता तब्बल अडीच तास उशिरा पोहचले. या वेळेत गायीची प्रकृती बिघडली व गायीचा जीव गेला. डॉक्टरांनी घटनास्थळी पोहचल्या नंतर माझी वाट न बघता तुमच्या पशुधनाची काळजी तुम्ही घेऊन राजुरा येथे घेऊन जायला पाहिजे होते, असे म्हणाल्याची माहिती आहे.
स्थानिक ठिकाणी पशु वैद्यकीय दवाखाना असून याठिकाणी सबंधित डॉक्टरांना राहण्यासाठी कॉटर ची व्यवस्था आहे. मात्र या ठिकाणासह संपुर्ण तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या स्थानिक ठिकाणी एक ही पशु वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने पाळीव प्राण्यावर वेळेवर उपचार होत नसेल तर हि आरोग्य यंत्रणा काय कामाची हा मोठा प्रश्न पशुधन मालक व शेतकऱ्यांसमोर आहे. यामुळे पशु वैद्यकीय दवाखान्यांनाच उपचाराची गरज आहे अशी चर्चा चर्चिली जात आहे.
निष्काळजीपणामुळे निष्पाप मुक्या जनावरांना जीव गमवावा लागत असल्याची खंत समोर आली आहे. सदर मालकास नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच दवाखाना असलेल्या स्थानिक ठिकाणी डॉक्टरांनी मुक्कामी राहण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेतील याकडे विहीरगाव वासियांचे लक्ष लागले आहे.