पोलिस भरती च्या शिपाई पदासाठी एका जिल्ह्यातून एकच उमेदवारी अर्ज मान्य करण्यात यावा

0
611

पोलिस भरती च्या शिपाई पदासाठी एका जिल्ह्यातून एकच उमेदवारी अर्ज मान्य करण्यात यावा

आमदार किशोर जोरगेवार यांची उपमुख्यमंत्री यांना मागणी, तत्काळ बैठक लावण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश

पोलीस भरती करिता अनेक उमेदवारांनी एकाच पदाकरिता अनेक जिल्ह्यातून अर्ज सादर केला आहे. त्यामुळे एका पदासाठी केवळ एकच आवेदन अर्ज सादर करणारया उमेदवारांवर अन्याय होत असुन एकाच पदाकरिता विविध जिल्ह्यातून अर्ज सादर करणारे उमेदवारही छाननी प्रक्रियेत अपात्र ठरण्याची शक्यता आहे. हि बाब लक्षात घेता कोणत्याही उमेदवारावर अन्याय न करता एका पदाकरिता केवळ एकाच जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज मान्य करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ना. फडणवीस यांनीही मागणीची तात्काळ दखल घेत यावर तोडगा काढण्यासाठी बैठक लावण्याचे आदेश सबंधित विभागाला दिले आहे.

आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी निवेदन देत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली आहे.

मागील काही वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस शिपाई पदभरती घेण्यात आलेली नव्हती. ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील तसेच अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थी मागील ३ ते ४ वर्षा पासुन पोलीस शिपाई भरतीची तयारी करीत पोलीस शिपाई बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते. अश्यात शिंदे – फडणवीस सरकार येताच पोलीस भरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जाहिरातही प्रकाशित करण्यात आली. संदर्भीय जाहिरातीच्या अटी व शर्तीनुसार प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्र राज्यातून एका जिल्ह्यासाठी पोलीस चालक पदासाठी १ आवेदन अर्ज व पोलीस शिपाई पदाकरिता ०१ आवेदन अर्ज करण्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु काही उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अनेक जिल्हातून आवेदन अर्ज सादर करून शारीरीक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे ते लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. आता एकाच उमेदवाराने अनेक जिल्हातून आवेदन अर्ज सादर केल्याने पात्रतेकरिता कट ऑफ लिस्ट मध्ये जास्त गुणांची आवश्यकता हवी आहे. त्यामुळे एका पदासाठी केवळ एक आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे.

नियमानुसार अनेक जिल्ह्यातून आवेदन करणाऱ्या उमेदवारांची यदाकदाचित निवड झाल्यास चौकशी दरम्यान त्यांनी अनेक आवेदन केल्याची बाब उघडकीस आल्यास ते अपात्र घोषित होऊन त्यांची निवड रद्द करण्यात येईल. त्यामुळे अशा उमेदवारांच्या छोट्याश्या चुकीमुळे सुध्दा त्यांची कारकीर्द खराब होऊन त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हि बाब लक्षात घेता प्रत्येक उमेदवाराला केवळ एकाच जिल्ह्यातील पदभरती आवेदन ग्राह्यता पकडून त्यांनी अर्ज केलेल्या कुठल्याही एकाच ठिकाणी चाचणी व लेखीपरीक्षा साठी पात्र करावेत तसेच कुठल्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही याकरिता योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी सदर निवेदनातून आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ना. देवेंद्र फडणवीस यांनीही याची दखल घेत याबाबत तात्काळ उच्च स्तरिय बैठक लावण्याचे आदेश संबधित विभागाला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here