गझलकार दिलीप पाटील यांना अण्णाभाऊ साठे वाङमय पुरस्कार जाहीर
राजुरा:- पुणे येथील मातंग साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाङमय पुरस्कार राजुरा येथील प्रसिद्ध गझलकार दिलीप सीताराम पाटील यांच्या ” हारलो पण अंत नाही” या पहिल्याच गझलसंग्रहाला जाहीर झाला आहे मातंग साहित्य परिषद पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन व समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी दिला जातो. यावर्षी या पुरस्काररासाठी ‘हारलो पण अंत नाही” या गझलसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.
दिलीप पाटील हे प्रसिद्ध गझलकार असून त्यांनी महाराष्ट्रात अनेक गझल मुशायऱ्यातून आपल्या गझला सादर केल्या आहेत. तसेच विविध नियतकालिके व वृत्तपत्रातून त्यांच्या रचना प्रकाशित झाल्या आहेत. यापूर्वी त्यांना “झाडीगौरव पुरस्कारही” मिळालेला आहे. सदर पुरस्कार त्यांना ११ एप्रिल रोजी, आद्य समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जन्मदिनी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक डॉ इसादास भडके, लोकनाथ यशवंत, गझलकार रमेश बुरबुरे, विरेनकुमार खोब्रागडे, प्रशांत भंडारे, डॉ किशोर कवठे अरूण झगडकर व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.