‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत कवी संमेलनाचे आयोजन
शासनाच्या मोहीमेला सहकार्य : फिनिक्स साहित्य मंचाचा जनजागृतीसाठी पुढाकार
चंद्रपूर :
सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून ११ सप्टेबरच्या शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. सदर मोहिम १५ सप्टेबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान राबविली जात आहे. यात आरोग्य पथक प्रत्येकाचे घरी जाऊन तपासणी करत असून उपचार व आरोग्य शिक्षण देत आहे. सदर विषयावर कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त फिनिक्स साहित्य मंचाने कविसंमेलनाचे आयोजन केले असून जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.
शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृत्ती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात पोंभुर्णा तालुक्यातील गावात कलापथकातून जाणिव जागृती करण्यात आली. जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहीमेचा विशेष प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने प्रसिद्ध कवी, निवेदक नरेशकुमार बोरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० ऑक्टोंबरला ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या विषयावर कविसंमेलन प्रसिद्ध युवा कवी व कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांच्या अध्यक्षतेत होईल. संचालन कवी मिलेश साकुरकर तर आभार कवी नरेशकुमार बोरीकर करतील. कवीसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन पोंभुर्णा गटविकास अधिकारी तथा कवी संमेलनाचे संयोजक धनंजय साळवे, कवी विजय वाटेकर, कवी नरेंद्र कन्नाके यांनी केले आहे. कविसंमेलनात सहभागी कविंच्या रचना शासन स्तरावर जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना फिनिक्स साहित्य मंचातर्फे सुपुर्द करण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.
••••