अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे…..!
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर बेमुदत संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. संपकऱ्यांची चर्चा यशस्वी झाली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला होता. संपुर्ण राज्यभर कर्मचारी संपात सहभागी झाले होते. अखेर आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल असे आश्वासन दिले. त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असे संपकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेले सात दिवस सुरू असणारा संप मागे मागे घेण्यात आला आहे, असे माननीय विश्वास काटकर यांनी जाहीर केले. ते म्हणाले, शासनाने नेमलेली समिती यावर विचार करणार असून जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी समितीला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन माननीय विश्वास काटकर यांनी केले आहे.
सात दिवस चाललेल्या संपाचा कालावधी हा अर्जित रजेत वर्ग केला जाणारा असून तो कालावधी नियमित केला जाणार आहे. तसेच संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले.