तहसील कार्यालयातील सेतू केंद्रासमोर घाणीचे साम्राज्य…
राजुरा (चंद्रपूर) : राजुरा तालुका निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याची ७५ वर्ष लोटून गेली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मागील वर्षी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शासनाकडुन स्वच्छतेची जनजागृती ही सातत्याने सुरू असते. मात्र तहसील कार्यालयातील नवीन सेतू केंद्रासमोर असलेल्या गटारीच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराच्या झाकणातून मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील सेतू केंद्रात काम करणाऱ्या संगणक परिचालक यासह येणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा धोका वाढला आहे. सेतूमध्ये कामासाठी येताना तोंडावर रुमाल बांधून असह्यतेने नागरीकांना यावे लागत आहे. आरोग्यंम धनसंपदा या म्हणीप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे प्रशासनाचे काम आहे. मात्र येथे खुद्द तालुका प्रशासनच गाफील दिसून येत असल्यामुळे स्वच्छतेच्या मंत्रालाच तिलांजली देण्याचे कार्य सुरू असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. यावर तातडीने उपाययोजना केल्यावरच स्वातंत्र्याचा खरा अमृत महोत्सव समजावा असा सूर उमटू लागला आहे.