विमानतळाकरिता भुसंपादित होत असलेल्या ताब्यातील जमिनीचा मोबदला मिळवून देण्याची केली विनंती…
मूर्ती येथील शेतकऱ्यांची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे मागणी
राजुरा/चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील भूमापन क्रमांक ११२ पैकी १ मधील जमिनीवर गेली ६० वर्षापासून मूर्ती येथील भूमिहीन कुटुंबे शेती करून आपली उपजीविका करत आहेत. मात्र मूर्ती येथील प्रस्तावित असलेल्या विमानतळाकरिता सदर जमीन भुसंपादित केली जात असल्याने सबंधित स्थानिक शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवणार आहे. यामुळे या जमिनीचा रीतसर मोबदला मिळवून देण्याची मागणी मूर्ती येथील शेतकऱ्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गेल्या ६० वर्षापासून या जमिनीवर मूर्ती येथील भूमिहीन कुटुंबांनी अतिक्रमण करून शेती करत आहेत. या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडे प्रत्येकी २ हेक्टर जमीन ताब्यात आहे. या ठिकाणी असलेली झुडुपे तोडून त्यांनी हि जमीन सुपीक केली असून या पिकांवर त्यांच्या कुटुंबांचा कसाबसा उदरनिर्वाह सुरू आहे. या जमिनीचे रीतसर पट्टे मिळावे याकरिता शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज केले असून सदर प्रकरण सबंधित अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. तर काही शेतकऱ्यांना रीतसर पट्टे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने सदर जमीन भुसंपादित केली असल्याने या जमिनीवर शेती करून पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे उघड्यावर पडतील. याशिवाय गेल्या दोन तीन वर्षापासून सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाले आहेत.
शासनाकडे सदर जमीन शासनाची असल्याची नोंद आहे. मात्र या जमिनीचे पट्टे मिळण्याकरिता केलेला पत्रव्यवहार व दंड भरल्याच्या पावत्या असल्याने साक्ष पुरावे देण्याची हमी शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतीशिवाय दुसरा व्यवसाय करता येत नसल्याने या जमिनीचे पट्टे अथवा मोबदला मिळवून देण्यात यावा. अन्यथा आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा टाहो सदर शेतकऱ्यांनी फोडला आहे.