तुळशीनगरमध्ये लवकरच उद्यानाची निर्मिती होणार

0
1016

तुळशीनगरमध्ये लवकरच उद्यानाची निर्मिती होणार

वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

चंद्रपूर : तुळशीनगरच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत. तुळशीनगरातील नागरिकांना उच्चतम सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या भागात सुंदर उद्यान निर्मिती करण्यात येईल, ज्यामुळे नागरिकांना योगसाधना केंद्र, व्यायाम केंद्र , जॉगिंग ट्रॅक आणि विरंगुळा केंद्र उपलब्ध होईल अशी घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

तुळशीनगर विकास समितीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर जोरगेवार, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, अविनाश राखोंडे, तुळशीनगर विकास समितीचे अध्यक्ष के. एन. देवतळे, उपाध्यक्ष दौलत रामटेके, सचिव अनिल देवतळे, कार्याध्यक्ष अनिल माथनकर,सौ. मंजुश्री कासनगोट्टुवार, पुरुषोत्तम सहारे, वासुदेव भोई, मालाताई रामटेके उपस्थित होते.

आपल्या संबोधनात ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर विकासाची मोठी जबाबदारी आहे. अशात चंद्रपूर सुंदर व अप्रतिम व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहोत. या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. चंद्रपूरला असे शहर बनवायचे आहे की प्रत्येकाला या शहराचा हेवा वाटावा.

सुसज्ज रस्ते, उद्याने, अभ्यासिका, वाचनालय, वन अकादमी, बांबु संशोधन केंद्र, पथदिव्यांची व्यवस्था, सैनिक शाळा, कॅन्सर हॉस्पीटल, बॉटनिकल गार्डन, रामसेतूच्या माध्यमातून चंद्रपूरचा विकास करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे नमूद करीत ना. मुनगंटीवार म्हणाले की, विकासाचे वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केले जाते. त्यामुळे चांदा अर्थांत चंद्रपूर सुंदर, स्वच्छ व विकासपूर्ण असणे नितांत गरजेचेच आहे. मध्यंतरीच्या काळात ठप्प झालेली विकास कामे आता पुन्हा सुरू झाल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर पंचसुत्री हाती घेण्यात आली आहे. त्यात कृषी, उत्तम दर्जाचे शिक्षण, सर्वोत्तम आधुनिक आरोग्य सेवा, रोजगार-स्वयंरोजगाराच्या आधुनिक सोयी, महिला विकास यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राज्यगिताने कार्यक्रमाची सुरुवात

तुळशीनगरातील कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ या राज्यगिताने करण्यात आली. नागरिकांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल ना. मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचे वर्ष म्हणून पुढील वर्ष साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे भामरागड ते रायगडपर्यंत शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.

या कार्यक्रमात रवी सोनेकर,शहानियाज खान,उमा पाल, अनिस शेख,मनोज वारजुरकर,मयूर भोई,साहेबराव मानकर, शालू सोनेकर,शालिनी सुरवाडे,नागमनी कन्नमवार, भूमेश्वरी भोयर,किशोरी राऊत,विनाताई देवतळे, मनीषा बोरडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here