भावना म्यान केल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही : सागर मुने
चारित्र्य आणि राष्ट्रभक्ती हीच शिवचरित्राची शिकवण
“माता पितांबद्दल परम श्रद्धा आणि त्यांच्या स्वप्नानुसार वागणे,शत्रूंना देखील विश्वास वाटावा असे अद्वितीय चरित्र आणि सर्वसामान्य प्रजाजनांमध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवत अठरा पगड जातीचे मर्द मावळे तयार केले. स्वराज्य आणि स्वदेश याबाबतीत प्राण समर्पित करणे इतकी निष्ठा जागृत करणे. या सर्वच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू काही भगवान राजा रामचंद्र यांच्या चरित्राचे अनुकरण करीत प्राप्त केल्या, त्यामुळेच शिवछत्रपतींचे राज्य रामराज्य प्रमाणे आदर्श राज्य ठरले. माता पिता आणि संस्कृती बद्दलचा आदर, चारित्र्य आणि राष्ट्रनिष्ठा हाच शिवप्रभूंची शिकवण आहे. महाराजांचे विचार, लिहण्याचे, ऐकण्याचे, पाहण्याचे नसून जगण्यासाठी आहे. प्रसंगी भावना म्यान केल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही.” असे विचार युवा पत्रकार आणि व्याख्याते सागर मुने यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असलेल्या माझं गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेच्या अठराव्या सत्रात ” थोरलं राजं सांगून गेलं !” या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार तथा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे उपस्थित होते.
प्रास्ताविकात माधव सरपटवार यांनी आज प्रथमच व्याख्याता म्हणून उपस्थित होत असलेल्या युवा पत्रकाराचे स्वागत करीत हाच या उपक्रमाचा उद्देश आहे हे अधोरेखित केले.
आपल्या शांत,संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषणात सागर मुने यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग मांडत त्यातून महाराजांनी आजच्या काळात आपल्याला दिलेला बोध उलगडून दाखविला. रामचरित्रासोबत शिवचरित्राचा असलेला सहसंबंध हा त्यांच्या विवेचनाचा विशेष आकर्षण बिंदू ठरला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये छत्रपती शिवराय हा डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात साठवण्याचा विषय आहे असे प्रतिपादन डॉ. दिलीप अलोणे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी तर आभारप्रदर्शन सचिव डॉ अभिजित अणे यांनी केले. जुमडे मॅडम यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेंगावार, प्रमोद लोणारे, देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.