वेकोलिच्या सास्ती खाण क्षेत्रात कोळशाची लूटमार
पोलिसांवर तस्कर भारी, हिरापूर व गोवरी परिसरात कोळशाचे ढीग
राजुरा (चंद्रपूर) : राजुरा शहरालगत असलेल्या वेकोलिच्या सास्ती खाण क्षेत्रात कोळसा तस्कर सक्रिय असून कोळशाची मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू आहे. कोळसा तस्करीचा हा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असताना कारवाई नाममात्र होत असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. आता तर कोळसा तस्करीमध्ये कमालीची वाढ झाल्याने तस्करच पोलिसांवर भारी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. हिरापूर, कुकुडसाद व गोवरी परिसरातील शेतशिवारात चोरीच्या कोळशाचे मोठमोठे ढिग दिसत असताना वेकोलि प्रशासनाच्या उपाययोजना नगण्य असल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सास्ती, गोवरी, पौनी, साखरी व गोयेगाव शिवारात ६ ते ७ कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून चांगल्या प्रतीचा कोळसा काढला जातो. याच खाणीतून लगतच्या काही सिमेंट कारखान्याला कोळसा पुरविला जातो. दरम्यान, सास्ती परिसरात कोळसा खाणी असल्याने कोळसा तस्करांनी डोके वर काढले आहे. सध्या या तस्करांनी सास्ती, साखरी, वरोडा, पौनी, गोयेगाव या खाण क्षेत्रातच दुकानदारी थाटली आहे.सोबतच काही तस्करांनी राजुरा गडचांदूर मागांवरच्या हरदोना, कुकुडसाद, हिरापूर, चंदनवही शिवारात कोळशाची खरेदी-विक्री सुरू केली आहे. यातील काही तस्कर रेल्वे गाड्यांमधील कोळशावर हात साफ करीत असल्याचे दिसून येत आहे. मधल्या काळात कोळसा तस्करीची काही प्रकरणे समोर आली. पण पोलिसांकडून होणारी कारवाई नाममात्र असल्याने तस्करच भारी पडत ‘असल्याचे स्पष्ट होत आहे. आजतागायत पोलिसांच्या चौकशीत तस्करीच्या पडद्याआड असलेल्या मुख्य तस्करांचा चेहरा समोर आलेला नाही. त्यामुळे तस्करांना खुली सूट मिळत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. या तस्करांवर पोलिसांचा वचक नसल्याने खाणीतील कोल स्टॉकवरून कोळसा चोरी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पोलिसांची हीच कार्यप्रणाली संशय निर्माण करणारी ठरत आहे.
शेतशिवारात कोळशाचे ढीग
सास्ती कोळसा खाण क्षेत्रालगतच्या हिरापूर, कुकुडसाद, गोवरी परिसरातील शेतशिवारात काही तरकरांनी अक्षरशदुकान थाटले आहे. सिमेंट कारखान्यात जाणाऱ्या वाहनातून कोळसा खरेदी केला जात आहे. पांढरपौनीलगत रेल्वेमधूनसुध्दा कोळसा चोरी होत असल्याची चर्चा आहे.