रानडुक्कराच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी मृत्यू
जिल्हा क्रिडा स्पर्धेत खो खो स्पर्धा जिंकणाऱ्या शिलाला मृत्यूने हरविले
सातारा तुकूम गिलबिली मार्गावर घडली घटना
पोंभूर्णा:- चंद्रपूर येथील शासकीय कार्यक्रम आटोपून देवाडा खुर्द ला येत असतांना सातारा तुकूम घटमाऊली जंगल परिसरातील मुख्य मार्गावर दुचाकीवरून उतरून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अंगणवाडी सेविकेला डुकराने दिलेल्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिला रविंद्र बुरांडे,रा.देवाडा खुर्द (वय ४०) वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.हि दुर्दैवी घटना शुक्रवारला संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
मृतक शिला रविंद्र बुरांडे या पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या.चंद्रपूर येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हा स्तरीय अधिकारी कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू असून यात अंगणवाडी सेविकेच्या संघाकडून खोखो स्पर्धेत भाग घेण्यासाठी चंद्रपूरला गेल्या होत्या. खोखो ची स्पर्धा आटोपल्यानंतर त्या देवाडा खुर्द ला आपल्या पतीसोबत दुचाकीने परत येत असतांना गिलबिली सातारा तुकूम मार्गावरील जंगल परिसरातील घट माऊली मंदिराजवळ त्या रस्त्याच्या कडेला उतरल्या.
यावेळी बाजुलाच झुडुपात असलेल्या डुकराने शिलाला मागाहून जोरदार धडक दिली यात त्या रोडवर पडल्याने तिच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या.
शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे दाखल करण्यात आले.उमरी पोलिस ठाण्याचे पोलिस पंचनामा करून पुढिल तपास करीत आहेत. मृतकाच्या पश्चात पती,दोन मुल,सासु, सासरे,बराच मोठा आप्तपरिवार आहे.शिला च्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटना घडुन अनेक तास लोटला असताना वनविभागाच्या कर्मचार्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र रोष व्यक्त केला जात आहे.