नागो गाणार सारखा उमेदवार पुन्हा मिळणे नाही : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
मतदार जागृती दिनी जागरूक राहात मतदानाचा संकल्प करावा : ना. सुधीर मुनगंटीवार
गाणार यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत दोन्ही नेत्यांचे आवाहन
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नागो गाणार यांच्यासारखा उमेदवार पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी सुयोग्य उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले नागो गाणार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी वन, सांस्कृति कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, सुदर्शन निमकर, संजय धोटे, जैनुद्दीन जव्हेरी, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष नितीन मत्ते, राजू भगत, संध्या गुरनुले, मतीन शेख, गिरीश चांडक, बंडु हजारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सुयोग्य उमेदवार निवडणे गरजेचे आहे. शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांच्या समस्या आदींसाठी नागो गाणार हे सातत्याने सजगपणे लढत असतात. विधान परिषदेतील अभ्यासू आमदार म्हणून नागो गाणार यांची ओळख आहे. पोटतिडकीने ते आपली भूमिका मांडत असतात. नागो गाणार विजयी झाले नाहीत; तर नुकसान शिक्षकांचेच होणार आहे. नागो गाणार हे सहजपणे सर्वांना उपलब्ध होणारे आमदार आहेत. शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रसंगी ते सत्ता कुणाची आहे, याचीही पर्वा करीत नाहीत. शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन आणि शिक्षक यांचे प्रश्न सोडवितानाही ते कुणाचीही तमा बाळगत नाहीत.
गाणार यांचे आतापर्यंतचे काम सलाम करावे असेच आहे. अनेक उमेदवार मायावी स्वप्न दाखवित निवडणुकीदरम्यान समोर येतील. परंतु नागो गाणार यांना सोडून अन्य कुणाला शिक्षकांनी कौल दिल्यास ते चुकीचे ठरेल. गाणार यांची उमेदवारी म्हणजे २४ कॅरेट सोन्यासारखी आहे. जात, पात आदी कोणत्याही निकषांवर आधारावर शिक्षकांनी मतदान करू नये. मतदार जागृती दिवसाला गाणार यांच्यासाठी ही सभा होणे ही साधी बाब नाही. प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या रक्ताचा थेंब सांडला तेव्हा लोकशाहीच्या शाईचा थेंब आपल्या हाताला लागला. त्यामुळे या शाईच्या थेंबाचा योग्य सन्मान राखत सर्वांनी गाणार यांच्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वांना केले.