महिलांच्या आरोग्य आणि शिक्षण याकडे विशेष लक्ष द्या – आ. किशोर जोरगेवार
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फातीमा शेख यांची जयंती साजरी
क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्यासह काम करत फातिमा शेख यांनी महिलांसाठी सुरु असलेली शिक्षणाची चळवळ पूढे नेली. त्यावेळी त्यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान अमुल्य होते. त्या मुस्लिम समाजाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून समोर आल्यात. त्यांनी पेटवलेली स्त्री शिक्षणाची ज्योत आज मशाल बनली आहे. त्यांची जयंती साजरी करत असतांना प्रत्येक स्त्री उच्च शिक्षीत झाली पाहिजे याचे प्रण घ्या, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने महिलांच्या शिक्षणा संबधित असलेले विषय अधिकाधिक आमच्या पर्यंत पोहचवत महिलांच्या आरोग्य आणि शिक्षण याकडे विशेष लक्ष द्यावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात फातिमा शेख यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून किदवाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. निहाज खान यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर संघटिका कौसर खान, शमा काजी, रुबीना शेख, उजमा शेख, तब्जुन शहनाज, गुलनाज शेख, सविता दंडारे, विमल कातकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, वैशाली मद्दीवार, नंदा पंधरे, रुपा परसराम, कविता निखारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, फातिमा शेख यांनी त्यांच्या घराच्या छताखाली स्वदेशी वाचनालय सुरू केले होते. येथे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी जाती, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दलित आणि मुस्लिम महिला आणि मुलांना शिकवले. मुलांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी फातिमा शेख या रात्रंदिवस झटत होत्या, एवढेच नाही तर सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पाच शाळांमध्येही त्यांनी शिकवले, मुस्लिम इतिहासातील ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असुन एक समाज म्हणून आपण त्यांना योग्य श्रेय दिले पाहिजे. दलित आणि मुस्लीम यांच्या पहिल्या संयुक्त संघर्षाला त्यांनी चिन्हांकित केल्यामुळे त्यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असतांना शिक्षणासंबधित असणारे फार कमी विषय समाजाच्या माध्यमातुन आमच्याकडे येतात याची खंतही यावेळी आ. जोरगेवार यांनी बोलुन दाखविली. महिलांमध्ये शिक्षणा प्रती जागृती झाली आहे. मात्र आजही अनेक मुली परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा घटकांसाठी आपल्याला काम करायचे आहे. कोरोना काळात आपण अनेकांचे शालेय शुल्क माफ करु शकलो. पूढेही शिक्षण क्षेत्रात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने उत्तम काम सुरु आहे. अनेक गरजु विद्यार्थ्यांना आपण शालेय वस्तु उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र यावर न थांबता यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या पदाधिका-र्यांनी शेवटच्या गरजुं पर्यंत पोहचत त्यांना शक्य ती मदत करावी असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी मुस्लिम समाजाच्या पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.