सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राजुरा येथे समाज प्रबोधन व विद्यार्थी युवा संवाद कार्यक्रम
राजुरा, 4 जानेवारी : राजुरा शहरात प्रथमताच काल सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त माळी समाजातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत जयघोषाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण आणि स्त्री मुक्तीचे कार्य, त्यासाठी त्यांनी कैलेला संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतनिमित्त माळी समाज आणि स्वराज्य फाउंडेशन, राजुरातर्फे आयोजित समाज प्रबोधन व विद्यार्थी युवा संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. मुख्य मार्गदर्शक, इतिहास अभ्यासक, व्याख्याते समीर लेनगुरे यांनी महिला शिक्षित झाली तर कुटुंबाला शिक्षित करून सर्वार्थाने समाजाला योग्य दिशा देऊ शकते यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार वामनराव चटप, मार्गदर्शक इतिहास अभ्यासक समीर लेनगुरे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य इंजि. नीलेश बेलखेडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी जि. प. सदस्य नानाजी आदे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे, समाजसेवक अमोल राऊत, जिल्हा परिषद हायस्कूल राजुराचे प्राचार्य किशोर उईके, ज्योती शेंडे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश पारखी, स्वराज आधार फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील मोहुर्ले, छावा फाउंडेशन चे अध्यक्ष आशिष करमरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विशाल शेंडे तर प्रास्ताविक समीक्षा वासनिक यांनी केले.