जयभीम वाचनालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथालय संघाचे विभागीय अधिवेशन
चंद्रपूर : सावली येथील जयभीम वाचनालयाचा अमृत महोत्सव समारोह व चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघ, नागपूर विभाग ग्रंथालय संघाच्या संयुक्त विभागीय अधिवेशनाचे आयोजन रविवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनात ग्रंथालयाच्या अनुदान वाढ विषयक अडचणी, नवीन ग्रंथालयास मान्यता, दर्जावाढ आदी महत्त्वाच्या विषयांवर अधिवेशनात राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर संवाद साधणार असल्याचे, सावली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष तथा वाचनालयाच्या अध्यक्ष लताताई लाकडे यांनी चंद्रपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, अध्यक्षस्थानी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, नगराध्यक्ष लताताई लाकडे, सहायक ग्रंथालय संचालक मीरा कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी भीमराव जीवणे, नागपूर विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटनानंतर सभासदांचा, विद्यार्थ्यांचा, वाचकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात ग्रंथालयाच्या वाढत्या अडचणी व शासनाची भूमिका यावर ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, सहायक ग्रंथालय संचालक मीरा कांबळे, नागपूर विभाग संघाचे अध्यक्ष अनिल बोरगवार मार्गदर्शन करणार आहे. सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील संविधान मनोहरे व संच यांचा सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचेही यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला सावली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष तथा वाचनालयाच्या अध्यक्ष लता लाकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, मारोती राऊत, घनश्याम भडके, वाचनालयाचे ग्रंथपाल डिलक्स डोहणे, सुनीता बोरकर आदी उपस्थित होते.