सॅटेलाईट मॅपींग करुन चंद्रपूरात झालेल्या बांधकामांना नियमीत करा – आ. किशोर जोरगेवार
अधिवेशनात बोलतांना केली मागणी
चंद्रपूरात सॅटेलाईट मॅपींग करुन झालेल्या बांधकामांना नियमीत करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलतांना केली आहे. यावर उत्तर देतांना चंद्रपूर माझा जिल्हा आहे. त्यामुळे त्याला न्याय देण्यासाठी सदर विषय मुख्यमंत्री यांना कळविणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने मतदार संघातील महत्वांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर अधिवेशनाच्या दुस-या दिवशी म्हाडा कडून सुरु करण्यात आलेल्या एसटीपी प्लांट मध्ये गैरप्रकार झाला असल्याच्या विषयावर बोलतांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली होती. सदर विषयासाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी उपोषण आंदोलन केले होते. या प्रश्नांवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची स्वतः पाहणी करुन गैरप्रकार आढळल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन दिले आहे.
तर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी पिंपरी – चिंचवड येथील विषयांवर चर्चा सुरु असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरकरासांठी महत्वाचा असलेला मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, पिंपरी – चिंचवड येथे सॅटेलाईट मॅपींग करुन अवैध रित्या झालेल्या बांधकामाला नियमीत केल्या जाणार आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या नदी क्षेत्रालगत पूर रेषा व पूर प्रतिबंधक निळी रेषा आहे. पुरातत्व विभागाचीही येथे अट आहे. सोबतच ग्रीन झोन, लिज लॅन्ड, रेवन्यू लॅन्ड आहे. त्यामुळे 60 ते 65 टक्के शहरात बांधकामाला मान्यता मिळत नाही. परिणामी येथे होत असलेले बांधकाम अवैध ठरत आहे. ही बाब लक्षात घेता पिंपरी – चिंचवड प्रमाणे येथेही सॅटेलाईटद्वारे मॅपींग करुन सर्व बांधकामाला नियमीत करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे. यावर उत्तर देतांना सदर विषयाला न्याय देण्यासाठी हा विषय मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे.