घुग्घुस जय भीम युवा मंचातर्फे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध
घुग्घुस, १४ डिसेंबर २०२२ : भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे. पैठणमधील एका कार्यक्रमात त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले. या वक्तव्याचे आता जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. जय भीम युवा मंच घुग्घुस शहर येथील पंचशील चौकात आक्रमक झाल्याचे आज पाहायला मिळाले. पाटील यांच्या निषेधार्थ पंचशील चौकात निदर्शने केली.
यावेळी पाटील यांच्या विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मुख्य मागणीचे निवेदन घुग्घुस पोलीस स्टेशनला देण्यात आले. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. पाटील यांच्या निषेधार्थ अनेक आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना रस्त्यांवर उतरल्याने दिसून येत आहे.
पाटील यांच्यावर अँट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच भीम सैनिक मनोज गरबडे यांच्यासह अन्य दोघांनी पाटील यांच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर ३०७, १२० – ब, ३५३ अन्वये गुन्हे दाखल केले. ते गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्या करण्यात आल्या. यावेळी घुग्घुस जयभीम युवा मंच, परिसरातील बरेच राजकिय पक्षातील नेते उपस्थित होते.