फ्लॅट विक्रीसाठी फसव्या जाहिराती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
आठ लाखाची सदनिका चार लाखात
आवाळपूर / सतीश जमदाडे
कोरपणा तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथे पी. एम. इन्फ्राव्हेंचरचा आवास प्रोजेक्ट ‘यशोधन विहार’चे काम सुरु आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ यासाठी 1050 फ्लॅटची निर्मिती व विक्री सुरू आहेत. वन बीएचके फ्लॅटची किंमत 836790/ रुपये आहेत शासनाकडून रुपये 450000/- अनुदान असल्याने वन बीएचके फ्लॅट फक्त 386790/- रुपयात मिळणार असे जाहिरातीचे मोठमोठे फलक शहरासह गावागावात जिल्हाभर लागले आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दोन लाख रुपयाचे अनुदान मिळण्याबाबत कुठलाही करारनामा नसताना पीएम इन्फ्राव्हेंचर कंपनी अनुदान मिळणार असल्याची जाहिरात देऊन नागरिकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार थेट गडचांदूर पोलीस स्टेशनला देण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘यशोधन विहार’ प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट खरेदी करताना नागरिकांनी फसवणूक टाळण्याकरिता संबंधित शासकीय कार्यालयामधून सर्व शहनिशा करूनच फ्लॅट खरेदी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, नांदा येथे श्रीवास्तव यांची जवळपास 51 एकर शेती आहेत या शेतीवर श्रीवास्तव यांच्या पी.एम. इन्फ्राव्हेंचर कंपनीकडून 1050 फ्लॅटची निर्मिती व विक्री सुरू आहेत नोडल एजन्सी म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे पी. एम. वाय. योजनेतून 250000/- रुपयांचे अनुदान मिळणार आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडूनही 200000/- अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याचे मोठमोठे होर्डिंग शहरासह गावागावात जिल्हाभर लावण्यात आले आहेत आठ लाखाची सदनिका चार लाखात मिळणार असल्याचा जाहिरातीतून मोठा गाजावाजा केल्याने ‘यशोधन विहार’ या आवासिय प्रकल्पात जिल्ह्यातील जवळपास 300 च्या वर नागरिकांनी फ्लॅट खरेदीसाठी बुकिंग केल्याची सूत्रांकडून विश्वसनीय माहिती आहे एकाच फ्लॅट खरेदीसाठी शासनाकडून दोन योजनेचे 450000/-अनुदान कसे काय मिळू शकते याबाबत शंकाकुशंका उपस्थित झाल्याने नांदा शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते अभय मुनोत यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांची कार्यालयात विचारणा केली असता आयुक्त कार्यालयातून माहिती देण्यात आली की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून दोन लाख रुपये अनुदान देण्याबाबत केलेल्या जाहिरातीशी आमच्या कार्यालयाचा कुठलाही संबंध नाही कोणत्याही इतर एजन्सीच्या माध्यमातून आम्ही अनुदानाचे वाटप करीत नाही असे सांगण्यात आले आहे पी.एम.इन्फ्राव्हेंचर कंपनीकडून करण्यात येणारी जाहिरात फसवी असल्याने या विरोधात गडचांदूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून यशोधन विहार या प्रकल्पात फ्लॅट खरेदी करताना दोन लाख रुपयाचे अनुदान मिळणार काय? फसवणूक होत तर नाही ना?याबाबत नागरिकांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातून माहिती घेऊनच व्यवहार करण्याची गरज आहे.
“आवास योजनेच्या मंजुरीसाठी 2017-18 मध्ये एजंट मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरून परिसरातील एक हजार नागरिकांचे आधार कार्ड जमा करण्यात आले होते मंजुरी नंतर बिल्डर कंपनीकडून सरकारी प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे ज्या परिवाराचे नावावर मंजुरी मिळाली त्यांना डावलून फ्लॅट करिता 450000/- अनुदान मिळणार अशी जिल्हाभर फसवी जाहिरातबाजी सुरु आहे नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे लवकरच यशोधन विहार आवास प्रोजेक्ट मधील अनुदानाचा घोटाळा समोर आणणार आहे.” – अभय मुनोत, माजी ग्रामपंचायत सदस्य, नांदा
“आमच्या कार्यालयाचे कोणताही करार झालेला नसून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जाहिरातीशी कार्यालयाचा कसलाही संबंध नाही.” – जानवी भोईटे, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर