अवैध कोळसा साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा छापा ; 25 ट्रक कोळसा जप्त
गडचांदूर/कोरपना : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काळे सोने असून सध्या जिल्ह्यात कोळसा चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातून गँगवारही झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र कोळसा चोरीला पूर्ण विराम लागलेला दिसून येत नाही. अशातच मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी छापा मारून अवैध विक्रीसाठी असलेला कोळशाचा मोठा साठा जप्त केल्याने कोळसा तस्करांची चांगलीच तारांबळ उडाली असून त्यांचे धाबे दणाणले आहे.
गडचांदूर धानोरा मार्गावरील भोयेगाव येथे अवैध कोळसा साठा असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांना मिळाली असता त्यांनी स्वतः गडचांदूर पोलीस चमुसह घटनास्थळी छापा मारून धडक कारवाई केली. यात जवळपास 24 ट्रक इतका अवैध कोळसा मिळाला असून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.