ऐन हंगामात शेतशिवारात बिबट व वाघाचा वावर…
पोटाच्या भाकरीसाठी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला…
विरुर स्टे./राजुरा : विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रातील कविटपेठ शेतशिवरात 13 नोव्हेंबरला सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान बिबट संचार करताना दिसून आल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांत चांगलीच दहशत निर्माण झाली असून कापूस वेचणी, गहू, हरभरा पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी व शेतमजुरांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र याचा प्रशासनाला पाझर फुटेल का…?
काही दिवसाअगोदर धानोरा येथील शेतकऱ्याचा बैल वाघाच्या हल्ल्यात ठार झाला तर तुम्मागुडा येथील रात्रपाळीत शेतपिकाची राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मचाणीवर चढून बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच सायंकाळच्या सुमारास कविटपेठ व देसाईपेठ (बंजारागुडा) मध्ये असलेल्या नाल्यालगतच्या शेतात बिबट दिसून आल्याची चर्चा जोरात असून परिसरात वनविभागाविरोधात चांगलाच रोष दिसून येत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ऐन याच शेती हंगामात सातत्याने परिसरात वाघ दिसून येत असल्यामुळे व वाघाच्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर व स्थानिक नागरिक चांगलेच संतापले आहेत.
यावर्षी पाच ते सहा पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र आता हाती आलेले कापसाचे पिक व गहू, हरभरा पेरणी जोमात सुरू असून जंगली जनावरांच्या हैदोसने पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी रात्रपाळीत रखवाली करणेही शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार असे उघड चित्र दिसून येत आहे. तर दिवसाने शेतात कापूस वेचणी, गहू व हरभरा पेरणीसाठी गेलेल्यांकडे घरच्यांच्या नजरा लागलेल्या असतात. यामुळे वर्षभर काबाडकष्ट करून पोटाचा चिमटा काढून उभे केलेले पिक शेतकऱ्याने सोडून द्यायचे का…? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वनविभागाने व वनमंत्री यांनी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन परिसरातील बिबट व वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी, शेतमजूर व नागरिकांतून केली जात आहे.