विरुर स्टेशन ग्रामपंचायतीत मोठा घोळ, सरपंचासह दोन ग्रामसेवक दोषी
माहिती अधिकारातून घोटाळा चव्हाट्यावर…
विरुर स्टे./राजुरा : विरुर स्टेशन ग्रामपंचायतीने कायद्याला बगल देत निधीचा अपहार केल्याचा संशय आल्याने गावातील सुजाण नागरिकांनी सन 2020 मध्ये 10 वेगवेगळ्या बाबींची माहिती अधिकारातून माहिती मागितली असता मोठा घोळ समोर आला. यातील 2018-19 या आर्थिक वर्षातील नाली-गटारे सफाई कामात मोठया प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उजेडात आला असून उर्वरित 9 बाबींची/प्रकरणाची चौकशी होणे बाकी आहे. यामुळे पुन्हा मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे.
सन 2018-19 मध्ये नाली सफाई कामात महिला सरपंचांनी आपल्या हितसंबंधातील (नातेवाईक) तसेच जवळच्यांची मजूर नावे टाकून ग्रामपंचायत निधीचा अपहार केला. त्यामुळे उर्वरित प्रकरणांची चौकशी केल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी गहाळ केल्याचा प्रकार उघडकीस येणार आहे.
मागील दोन वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तीनदा चौकशी केल्यानंतर राज्य माहिती आयुक्त नागपूर यांच्या अंतिम अपील सूनवाईत कागपत्रांच्या आधारे विद्यमान सारपंचा व दोन ग्रामसेवक यांना दोषी ठरविण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात दोषींना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याने व कारवाई सुरू झाल्याने ग्रामपंचायत निधीचा अपहार करणाऱ्या दोषींमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
ग्रामपंचायत मध्ये झालेली अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार यात दोषी असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा कर्मचारी यावर कार्यवाही साठी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक व्हीपीएम-2016/प्र. क्र. 253/परां-3 बांधकाम भवन, 25 मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई दिनांक 4 जानेवारी 2017 अंतर्गत गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा द्वारा तातडीने संबंधित दोषी सरपंच व ग्रामसेवक यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दोषींनी हडप केलेला निधी रक्कम वसूल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे पंचायत समिती राजुराचे गटविकास अधिकारी या जबाबदारी ने कधीपर्यंत योग्य कार्यवाही करतील याकडे गावातील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणात लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. यात ग्रामपंचायत सदस्यही सहभागी असल्याने त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्तमान महिला सरपंचा यांच्या कार्यकाळात पाणी पुरवठा, पथदिवे, नाली सफाई यासारख्या महत्वपूर्ण समस्यांमुळे नागरिक त्रस्त होते. या घोटाळ्यातील कडक कार्यवाहीची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. कोणतेही ग्रामपंचायत प्रशासन प्राप्त निधीचा गैरव्यवहार करणार नाही, कडक कार्यवाहीमुळे होणाऱ्या प्रकाराला आळा बसेल आणि ग्रामीण भागाचा वास्तववादी विकास होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.