कोट्याधीशांच्या गावात कोट्यवधीचा चुना…
● साखरी गावातील घटना
● मुदत ठेवीच्या नावावर करोडोची फसवणूक
● पीडितांची पोलिसांत तक्रार दाखल
राजुरा, ता. २८: वेकोलिच्या भूमिअधिग्रहणामुळे कोट्याधीशांचे गाव म्हणून तालुक्यातील साखरी गाव नावारूपास आले. मात्र याच गावातील युवकाने काही ग्रामस्थांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोटयवधी रुपयांनी फसविले. या फसवणुकीतील पीडीतांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
राजुरा तालुक्यात साखरी येथे वेकोलिचा पोवनी-२ व पोवनी-३ प्रकल्प आला. पहिल्यांदा वेकोलिने प्रकल्पास्तांना जमिनीचा मोबदला जास्त दिला. यामुळे साखरी गाव जिल्ह्यातील करोडपती गाव म्हणून प्रसिद्ध झाले. अनेकांना जमिन अधिग्रहणाच्या मोबदला कोट्यवधी मिळाला. या मिळालेल्या पैशातून काहींना इतर ठिकाणी शेतजमिनी घेतल्या. बँकेत मुदत ठेवीत गुंतवणूक केली.
गावातीलच नीश नामक युवक बैंक ऑफ इंडिया शाखेत स्टार युनिअन डायल या कंपनीची विमा प्रतिनिधी म्हणून काम करायचा. बँकेने नवीन योजना आणली आहे. यात मुदत ठेवीवर महिन्याला जास्त व्याज मिळेल. गुंतवणुकदारांचे रक्कम कधीही काढता येईल, असे सांगून जवळपास दहा ते बारा जणांकडून कोटी रुपये घेतले. दोन ते तीन महिने व्याजाची रक्कमसुद्धा दिली. नियमित व्याज मिळत असल्याने आतापर्यंत कुंपणावर असलेल्यांनीसुद्धा आपला पैसा त्याच्याकडे सुपूर्द केला. नागरिकांची खात्री पटवी, यासाठी त्याने गुंतवणूकदारांचे बँकेत नवीन खाते काढले. बैंक ऑफ इंडिया शाखेच्या शिक्का मारलेल्या पावत्या आणून नागरिकांना दिल्या. त्यांनाही दोन तीन महिने व्याज दिले.
यानंतर नीलेशला दारूचे व्यसन जडले. एक दिवस आत्महत्या करण्यासाठी घर सोडून गेला. त्याच्या अशा वर्तणुकीने गुंतवणुकदार सर्तक झाले. त्यांनी बँकेत चौकशी केली. तेव्हा त्याने दिलेल्या पावत्या बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झालेल्यांनी नीलेशकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने रक्कम देण्यास असमर्थता दाखविली. उदरनिर्वाहाचे साधन असलेली जमीन गेली, पैसेही गेले.
त्यामुळे पिडीतांना मोठा धक्का पोचला आहे. दरम्यान काहीनी पोलिसांकडे याची तक्रार केली आहे. यांची समजूत काढत नीलेशने पैसे परत करण्याची हमी दिली आहे. मात्र त्याच्या विरोधातील तक्रारीत रोज भर आहे. दुसरीकडे पोलिसांनी अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
“एक दोन नागरिकांच्या तक्रारी आल्या आहे. जसजशा तक्रारी येईल. त्या सर्व तक्रारीची चौकशी करण्यात येईल. तपासाचा अहवाल वरिष्ठाना पाठवून पुढील कारवाई केली जाईल.”
– संतोष दरेकर, सहायक पोलीस निरीक्षक राजुरा