माजी आमदार चटप यांचा गावात शेतकरी संघटनेला भोपळा

0
1018

माजी आमदार चटप यांचा गावात शेतकरी संघटनेला भोपळा

आशिष देरकरच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा काँग्रेसची सत्ता

इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संघटना शून्यावर

 

नांदाफाटा :- राजुरा विधानसभेचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या गावात काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली असून चटपांना खातेही खोलता आले नाही. सरपंचासह काँग्रेसने दहा जागांवर विजय मिळवला तर उर्वरित दोन जागांवर भाजपने कब्जा मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत शेतकरी संघटनेला भोपळा मिळाला असून इतिहासात पहिल्यांदाच संघटनेला शून्यावर समाधान मानावे लागले.

जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या बिबी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसचे युवा नेते आशिष देरकर यांच्या नेतृत्वात तब्बल दहा जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.

बिबी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले होते. बिबी हा गाव शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांचा स्वगाव असल्याने शेतकरी संघटनेचा हा बालेकिल्ला मानल्या जातो. मात्र मागील पंचवार्षिकमध्ये बिबी ग्रामपंचायतीत नागरिकांनी बदल घडवीत शेतकरी संघटनेला संधी न देता सत्तेची सूत्रे काँग्रेसच्या ताब्यात दिली. मात्र माजी सरपंच मंगलदास गेडाम व माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या नेतृत्वात अनेक विकासात्मक कामे गावात करण्यात आली. विकासाची करण्यात आलेली कामे ही काँग्रेससाठी जमेची बाजू होती. यावेळी ही लढत शेतकरी संघटनेसाठी अस्तित्वाची झाल्यामुळे त्यांनी आपली पूर्ण ताकद झोकून दिली होती. मात्र एकही सीट न मिळाल्याने शेतकरी संघटनेची बालेकिल्ल्यातच फजिती झाली.

काँग्रेसच्या सरपंच पदाच्या उमेदवार माधुरी टेकाम यांनी १५४० मते प्राप्त करून ४६१ मताधिक्यांनी शेतकरी संघटनेच्या सुनिता सिडाम हिचा पराभव केला. आशिष देरकर यांनी ६१० मते प्राप्त करून २०६ मताधिक्यांनी माजी सरपंच संतोषकुमार पावडे यांचा पराभव केला. सोनाली आत्राम हिने ६०२ मते प्राप्त करून १९१ मताधिक्यांनी वंदना कोडापे हिचा पराभव केला. भारती पिंपळकर ५६० मते प्राप्त करून १०९ मताधिक्याने माया खाडे हिचा पराभव केला. बंडू नैताम यांनी ४१५ मते प्राप्त करून १०६ मताधिक्यांनी अजय पेंदोर यांचा पराभव केला. प्रणाली कोरांगे हिने ४०१ मते प्राप्त करून ७३ मताधिक्याने पौर्णिमा मट्टे हिचा पराभव केला. गीता मिलमीले हिने ३९४ मते प्राप्त करून ६२ मताधिक्याने संगीता उरकुडे हिचा पराभव केला. शिवराज बसवंते २६९ मते प्राप्त करून मुकुंदा गुलबे यांचा ९७ मताधिक्याने पराभव केला. राजू नन्नावरे यांनी २८५ मते प्राप्त करून १२६ मताधिक्यांनी सचिन सिडाम यांचा पराभव केला. सुरज कुळमेथे यांनी २४३ मते प्राप्त करून ५८ मताधिक्यांनी मतांनी गुलाब गेडाम यांचा पराभव केला. भाजपच्या दुर्गा पेंदोर हिने २१८ मते प्राप्त करून सहा मताधिक्याने रंजूताई येरमे हिचा पराभव केला तर लीलाबाई चंद्रगिरी यांनी २१५ मते प्राप्त करून ३ मतांच्या फरकाने प्रतीक्षा तुंगपल्ली हिचा पराभव केला.

 

हा सत्याचा विजय – आशिष देरकर
चिखलगाव ते स्मार्ट व्हिलेज असा प्रवास केल्यानंतर गावाचे नावलौकिक वाढले. त्यामुळे विरोधकांनी खोटे आरोप करून गावाला व मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदानातून मतदारांनी विरोधकांना धडा शिकविला. शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात एकही उमेदवार निवडून न आल्याने शेवटी सत्याचा विजय झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here